तो आपल्यात होता… ओमराजे निंबाळकरांविषयी उद्धव ठाकरे यांच्या मनात काय? शिंदे सेनेची धडधड वाढणार?

Uddhav Thackeray on Omraje Nimbalkar: आज मातोश्रीवर धाराशिव जिल्ह्यातील नगरसेवक दाखल झाले. त्यांच्याशी उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. त्यावेळी नुकतेच पक्षातून फुटून बाहेर पडलेले उद्धव ठाकरे यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांनी मोठे संकेत दिले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

तो आपल्यात होता... ओमराजे निंबाळकरांविषयी उद्धव ठाकरे यांच्या मनात काय? शिंदे सेनेची धडधड वाढणार?
उद्धव ठाकरे, ओमराजे निंबाळकर, शिवसेना
Image Credit source: एजन्सी
| Edited By: | Updated on: Aug 19, 2026 | 8:06 PM

उद्धव ठाकरे यांना शिवसेना फुटीनंतर सहा खासदारांनी दे धक्का दिला. 22 जून 2026 रोजी ओमराजे निंबाळकर यांच्यासह पाच खासदारांनी शिंदे सेना जवळ केली. त्यामुळे एकूण 9 खासदारांपैकी 6 खासदार शिंदे सेनेत डेरेदाखल झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पश्चिम विदर्भासह मराठवाडा पिंजून काढला. तीन ते चार ठिकाणी सभा आणि बैठका घेतल्या. या खासदारांवर तोफ डागली. पण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. आज धाराशिवच्या नगरसेवकांसोबत त्यांनी मातोश्रीवर बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करणार नाही, असे स्पष्ट केले. शिवसेना कुणाची यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना ठाकरेंच्या या वक्तव्याला मोठे वलय प्राप्त झाले आहे.

तो आपल्यातच होता

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांची आज धारशिवच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ओमराजे निंबाळकर यांच्यावर मी टीका करणार नाही, तो आपल्यात होता, अशी भूमिका त्यांनी जाहीर करताच सर्वांच्या मनात पाल चुकचुकली. ठाकरे यांच्या मनात काय सुरू आहे यावरून तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. शिवसेनेवरून सुप्रीम सुनावणी सुरू असताना ओमराजेंविषयी त्यांच्या मनातील हळवा कोपराही उघड झाला.

पदाधिकाऱ्यांना सूचना

आपल्याला लढायचं आहे. तुम्ही मनाने इथे आहात ना? धाराशिव हा आपला बालेकिल्ला आहे. मी जेव्हा दौऱ्याला आलो तेव्हा धाराशिव जिल्ह्यात चांगला उत्साह होता तोच उत्साह कायम ठेवा. शिवसेना ही तळपती तलवार आहे ती तशीच राहिली पाहिजे. शिवसेना ही सामान्य जनतेची प्रश्न सोडवणारी संघटना आहे. जनतेची प्रश्न सोडवा. शेतकरी कर्जमाफीवरून सरकारने कर्जमाफी केली आहे यावर लक्ष द्या. रस्त्यावरील खड्डे आणि काम यासंदर्भात प्रश्न असतील तर त्याला वाचा फोडा अशा सूचना त्यांनी पदाधिकार्‍यांना दिल्या.

ओमराजे शिंदे सेनेत

जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच उद्धव सेनेचे सहा खासदार फुटणार असे मानले जात होते. त्याची चर्चा ही सुरू होती. त्यानंतर अचानक विविध कारणं पुढं करत ठाकरे गटातील खासदारांनी बोलावलेल्या बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली. त्यानंतर त्यातील काहींचे मोबाईल स्विच ऑफ आले. अखेर सहा खासदार फुटीवर शिक्कामोर्तब झाले.

ओमराजे निंबाळकर- धाराशिव

नागेश पाटील आष्टीकर- हिंगोली

संजय देशमुख – यवतमाळ-वाशिम

संजय जाधव – परभणी

भाऊसाहेब वाकचौरे- शिर्डी

संजय दिना पाटील – मुंबई उत्तर-पूर्व

या सर्वांनी 22 जून 2026 रोजी अधिकृतपणे शिंदे सेनेत प्रवेश केला. पण ओमराजे निंबाळकर यांचे अखेरपर्यंत तळ्यात मळ्यात सुरू होते. त्यांनी मध्यंतरी मातोश्रीवर जाण्याचाही निर्णय जाहीर केला. नंतर ते तडक मतदारसंघात पोहचले आणि त्यांनी विकासाच्या मुद्यावर शिंदे सेनेत जाण्याचे जाहीर केले. तेव्हापासून हे सहाही खासदार प्रसिद्धीपासून आणि सार्वजनिक कार्यक्रमापासून फटकून वागत आहेत. या खासदारांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचे टाळले आहे. सुरुवातीला ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली. आता त्यांची ही बदलती भूमिका अनेकांना कोड्यात टाकणारी वाटत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us