मुंबईत 246 विसर्जनस्थळी दीड लाखाहून अधिक मूर्तींचे विसर्जन, अडीच लाख किलोहून अधिक निर्माल्यापासून खतनिर्मिती

गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाचा गणेशोत्सव देखील कोविड या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने या अनुषंगाने प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले होते.

मुंबईत 246 विसर्जनस्थळी दीड लाखाहून अधिक मूर्तींचे विसर्जन, अडीच लाख किलोहून अधिक निर्माल्यापासून खतनिर्मिती
Ganesh Visarjan

मुंबई : गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाचा गणेशोत्सव देखील कोविड या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने या अनुषंगाने प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. त्याचबरोबर यंदाचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने व वारंवार करण्यात येत होते. या आवाहनांना मुंबईकर नागरिकांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अधिकाधिक परिणामकारक अंमलबजावणी करण्यास सहकार्य केले. सोबतच गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यास प्राधान्य दिले असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. (Visarjan of 1,64,761 idols at 246 Visarjan sites in Mumbai during Ganeshotsav, composting from 2,65,989 kg collected waste)

मुंबईकरांच्या सहकार्याने यंदाचा श्री गणेशोत्सव हा उत्सवाचे पावित्र्य जपत शांततेत व सुव्यवस्थेत संपन्न झाला आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, बृहन्मुंबई व मुंबई उपनगरे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, सर्व संबंधीत संस्था आणि मुंबईकर नागरिकांचे महापौर किशोरी किशोर पेडणेकर व महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आभार मानले आहेत.

नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळे व मूर्ती विसर्जन आकडेवारी

यंदाच्‍या श्री गणेशोत्‍सवात संपूर्ण मुंबईतील 73 नैसर्गिक स्‍थळे आणि 173 कृत्रिम तलावांमध्ये सुमारे 1 लाख 58 हजार 229 श्री गणेशमूर्तींचे व 6 हजार 532 इतक्या संख्येतील हरतालिका / गौरी मूर्तींचे विसर्जन करण्‍यात आले. यानुसार एकूण 1 लाख 64 हजार 761 मुर्त्यांचे विसर्जन श्रीगणेशोत्सव काळात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापैकी 79 हजार 129 इतक्या संख्येतील मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावांमध्‍ये करण्‍यात आले आहे. तर उर्वरित 85 हजार 632 इतक्या संख्येतील मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक विसर्जन स्थळी करण्यात आले आहे. कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या 79 हजार 129 मुर्त्यांपैकी 75 हजार 687 या घरगुती स्तरावरील मूर्ती होत्या. तर उर्वरित 3 हजार 502 गणेशमूर्ती या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या होत्या. ही आकडेवारी लक्षात घेता, कृत्रिम विसर्जन स्थळी मुर्त्यांचे विसर्जन करण्यास मुंबईकर नागरिकांनी लक्षणीय प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.

नैसर्गिक विसर्जन स्थळी विसर्जन आकडेवारी

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 73 नैसर्गिक विसर्जन स्थळांमध्ये 85 हजार 632 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये 82 हजार 339 एवढ्या गणेशमूर्ती होत्या, तर 3 हजार 293 एवढ्या हरतालिका / गौरी मूर्ती होत्या. नैसर्गिक स्थळी विसर्जित करण्यात आलेल्या 82 हजार 339 गणेशमूर्तीपैकी 77 हजार 814 या घरगुती गणेशमूर्ती होत्या, तर 4 हजार 525 या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती होत्या.

कोणत्या दिवशी, किती विसर्जन?

73 नैसर्गिक व 173 कृत्रिम अशा एकूण 246 विसर्जन स्थळी एकूण 1 लाख 64 हजार 761 इतक्या संख्येतील मूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 66 हजार 299 इतक्या संख्येतील मुर्त्यांचे विसर्जन हे गणेशोत्सवाच्या 5 व्या दिवशी अर्थात दिनांक 14 सप्टेंबर 2021 रोजी झाले. तर त्या खालोखाल 48 हजार 716 इतक्या संख्येतील मुर्त्यांचे विसर्जन हे गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दीड दिवस) अर्थात दिनांक 11 सप्टेंबर 2021 रोजी झाले. त्यानंतर 34 हजार 452 इतक्या संख्येतील मुर्त्यांचे विसर्जन हे गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी अर्थात दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोजी करण्यात आले. तर सर्वांत कमी म्हणजेच 15 हजार 294 इतक्या मुर्त्यांचे विसर्जन हे दिनांक 16 सप्टेंबर 2021 रोजी अर्थात गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी करण्यात आले.

निर्माल्य संकलन व खतनिर्मिती

मूर्ती संकलन व विसर्जनानंतर, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाने सर्व स्थळांवरील निर्माल्य संकलित करण्याचे कामकाज त्‍वरेने पूर्ण केले. दिनांक 10 ते 11 सप्टेंबर 2021 या कालावधी दरम्यान एकूण 2 लाख 65 हजार 279 किलोग्रॅम इतके निर्माल्‍य संकलित करण्‍यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 60 हजार 900 किलो इतके निर्माल्य हे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी अर्थात दिनांक 14 सप्टेंबर 2021 रोजी करण्यात आले. या संकलित करण्यात आलेल्या विविध 38 ठिकाणी या निर्माल्‍यावर शास्‍त्रोक्‍त पद्धतीने प्रक्रिया करण्‍यात आली आहे व करण्यात येत आहे. यानुसार बाप्पाला वाहिलेल्या दुर्वा, फुले, हार इत्यादींच्या निर्माल्यापासून तयार करण्यात येणाऱ्या खताचा उपयोग हा प्रामुख्याने महापालिकेच्या उद्यानांमध्ये करण्यात येणार आहे.

इतर बातम्या

किरीट सोमय्यांकडून आरोपांच्या फैरी, अजित पवारांनी एका वाक्यात निकाल लावला!

आता महाविकास आघाडीही वात पेटवणार, फडणवीस सरकारच्या काळातील फायली काढणार; नाना पटोलेंचा इशारा

VIDEO: मुख्यमंत्र्यांना माहिती आहे की नाही माहीत नाही, राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांची सावध प्रतिक्रिया, सोमय्यांवरील कारवाईवर आघाडीत मतभेद?

(Visarjan of 1,64,761 idols at 246 Visarjan sites in Mumbai during Ganeshotsav, composting from 2,65,989 kg collected waste)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI