जिथं स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली ते अंबानींचं अँटेलिया हाऊस कसं आहे?

अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ गाडी सापडली असून घातपाताच्या उद्देशाने ठेवल्याचा संशय आहे. मुंबई पोलीस आणि एसएसजीची सिक्युरिटी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:24 PM, 25 Feb 2021
जिथं स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली ते अंबानींचं अँटेलिया हाऊस कसं आहे?

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ एक संशयित कार आढळली आहे. अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ गाडी सापडली असून घातपाताच्या उद्देशाने ठेवल्याचा संशय आहे. मुंबई पोलीस आणि एसएसजीची सिक्युरिटी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सहआयुक्त विश्वास नांगरे पाटीलही पोहोचल्याची माहिती मिळतेय. संबंधित कारमध्ये जिलेटिनने भरलेली स्फोटकं असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. याबाबत पोलिसांनी अधिकृत अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार गाडीत स्फोटकं असल्याचं समोर येत आहे. पोलिसांचा सध्या तपास सुरु आहे.(features of Mukesh Ambani’s Antelia Bungalow)

कसं आहे जगातील सर्वात महागडं घर?

दरम्यान, जिथं स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली ते अंबानींचं अँटेलिया हाऊस कसं आहे? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तर, देशातील सर्वात महागडं हे घर आहे. दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर हा बंगला आहे. या बंगल्यात एकूण 27 मजले आहेत. या बंगल्याच्या इंटेरियरवर बरंच काम करण्यात आलं आहे. 4 लाख चौरस फुटांवर असलेली ही इमारत 570 फूट उचं आहे. फोर्ब्सच्या मते, या घराची किंमत जवळजवळ 6 हजार कोटी रुपये आहे. तर डॉलरमध्ये याची किंमत 2 बिलियन डॉलर( जवळजवळ 125 अब्ज) आहे. तसंच ही इमारत उभारण्यास तब्बल 11 हजार कोटी रुपये खर्च आला होता. 8 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला, तरी ही इमारत हलणारही नाही, असा दावा केला जातो.

अँटेलियात कोणकोणत्या सुविधा?

अँटेलिया इमारचीच्या सहाव्या मजल्यापर्यंत पार्किंग असून त्यात 168 गाड्या पार्क होऊ शकतात. नीता अंबानी यांच्या मते हे घर जेवढं मॉडर्न आहे, तेवढंच त्यातील खास बाबींमुळे ते भारतीयही आहे. या बंगल्यात भारतीय संस्कृती दाखवणारे मंदिर, मूर्ती यांचा वापर अगदी योग्यरित्या केल्याचं सांगितलं जातं. या घराच्या छतावर 3 हेलीपॅड आहेत. घरातच स्वीमिंग पूल आणि स्पा रुमही आहे. तसंच सिनेमागृह, जिम आणि बॉलरुमही आहे. मुंबईत सर्वच ठिकाणी एसीची मोठी गरज भासते. पण, अंबानींच्या अँटेलियात एसीची गरज नाही. संपूर्ण घरात तापमान गरजेनुसार ठेवता येतं. मुकेश अंबानी यांच्याजवळ स्वत:ची एक एअरबसही आहे.

अटलांटिक महासागरातील बेटावरुन नाव

अटलांटिक महासागरातील एका पौराणिक बेटावरुन या घराचं नाव अँटिलिया असं ठेवण्यात आलं आहे. अँटेलियामध्ये एक सुंदर हँगिंग गार्डनही आहे. अँटेलियाचं डिझाईन शिकागोतील आर्किटेक्ट ‘पर्किन्स’नं तायर केलं आहे. तर या बंगल्याचं कंस्ट्रक्शन ऑस्ट्रेलियन कंपनी ‘लँग्टोंग होल्डिंग’ यांनी केलं आहे.

कचऱ्यापासून वीज निर्मिती

27 मजल्याच्या या घरात 600 नोकर काम करतात. घराची देखभाल करण्याबरोबरच हे सर्व नोकर घरातील छोट्या-छोट्या गोष्टीची काळजी घेतात. सोशल मीडियात या घरातील कचऱ्याबाबत बोलतं जातं. तर या घरातील कचऱ्यापासून वीज बनवली जाते. ही वीज त्यांच्या घरातच वापरली जाते. अंबानींच्या घरातील कचरा फेकला जात नाही. तर त्याच्यापासून वीजनिर्मिती केली जाते. सर्वात आधी सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा केला जातो. त्यानंतर त्याच्यापासून वीज बनवली जाते.

संबंधित बातम्या :

मोठी बातमी : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ संशयित कार, घातपाताचा उद्देश असल्याचा संशय

मुकेश अंबानी आजोबा झाले, अंबानी कुटुंबात छोट्या पाहुण्याचे आगमन

features of Mukesh Ambani’s Antelia Bungalow