शिंदे गटाच्या या नेत्यांवर आता सोमय्या यांची चुप्पी का?, मनीषा कायंदे यांचा सवाल

गोविंद हटवार, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 21, 2023 | 9:30 PM

प्रताप सरनाईक यांच्याबद्दल विचारलं की ते पळ काढतात. यांच्याबद्दल सोमय्या बोलणार नाहीत. कारण ते आता धुतल्या तांदळासारखे स्वच्छ झालेत, असंही मनीषा कायंदे यांनी सुनावलं.

शिंदे गटाच्या या नेत्यांवर आता सोमय्या यांची चुप्पी का?, मनीषा कायंदे यांचा सवाल
मनीषा कायंदे

मुंबई : कोविड सेंटर मुंबई आणि महाराष्ट्रात झाले का? केवळ मुंबई मनपावर त्यांचा डोळा आहे. लाखोंच्या संख्येने कोरोना झालाय. आपत्ती व्यवस्थापनानुसार, अनेक अधिकार मनपा आयुक्तांकडे होते. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडेही अधिकार होते. पूर्ण टास्क फोर्स नेमला होता. सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाकाळात मुंबई, धारावीतील कामाची प्रसंशा केली होती. ते भाजपला दिसत नसल्याची टीका मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी केली. दरम्यान, किरीट सोमय्या यांना आरोप करण्याची सवय आहे. भावना गवळी यांच्यावर त्यांनी आरोप केले होते. त्याचं काय झालं? अशावेळी किरीट सोमय्या पत्रकार परिषदेतून पळ काढतात.

तर सोमय्या पळ काढतात

यशवंत जाधव यांच्याबद्दल विचारलं की किरीट सोमय्या पळ काढतात. प्रताप सरनाईक यांच्याबद्दल विचारलं की ते पळ काढतात. यांच्याबद्दल सोमय्या बोलणार नाहीत. कारण ते आता धुतल्या तांदळासारखे स्वच्छ झालेत, असंही मनीषा कायंदे यांनी सुनावलं. उद्या कुणीही शिंदे गटात गेल्यास त्यांच्या सर्व चौकशा बंद होतील.

राज्यात उत्साहाचं वातावरण राहणार

२३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त राज्यात उत्साहाचं वातावरण असतं. मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राज्यभरात होणार आहेत. षण्मुखानंद हॉल येथे उद्धव ठाकरे यांचं प्रमुख मार्गदर्शन असणार आहे. रिगल सिनेमा मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तिथं हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जमणार आहेत. २३ जानेवारीला विविध कार्यक्रम होणार असल्याचं मनीषा कायंदे यांनी सांगितलं.

वकिलांचा जोरदार युक्तिवाद

उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. तेच अनेक वर्षे आमचे पक्षप्रमुख राहणार आहेत, यात कोणतंही दुमत नाही. निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. समोरच्यांचे वकील निरुत्तर झाले. त्यांच्या युक्तिवादात कोणतेही मेरिट नव्हते, अशी टीकाही मनीषा कायंदे यांनी केली.

कालच हा निर्णय होणं अपेक्षित होतं. पण, केंद्रीय यंत्रणांवर दबाव असतो. ईडी, सीबीआयवर दबाव असतो. काल आमच्या बाजूनं निर्णय होणं अपेक्षित होतं. ४० आमदार आणि १३ खासदार निघून गेले. याचा अर्थ ते पक्ष नाहीत, असंही मनीषा कायंदे यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI