
Sanjay Raut on BMC Mayor: मुंबई महापौर पदाची निवड कधी होणार हे अद्याप समोर आलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन परताच जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात ते उतरले आहेत. आता महापौर पदाची निवड कधी होणार याची चर्चा सुरू आहे. मुंबईत वेगवान घडामोडी घडत आहे. शिंदे सेना गट स्थापनेसाठी पुढे आली आहे. शिंदे सेनेने महापौर पदावर दावा केला आहे. तर भाजप संख्याबळानुसार ही संधी सोडायला तयार नाही. त्यावरून सकाळी सकाळीच खासदार संजय राऊतांनी शिंदे सेनेवर जहरी टीका केली. त्याचवेळी मुंबईचा महापौर हा भाजपचाच होईल आणि शिंदे सेना निमुटपणे त्याला पाठिंबा देईल असा दावा केला आहे.
मुंबईचा महापौर भाजपचा होईल
तर आज मुंबईतील शिंदे सेनेचे नगरसेवक स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी कोकण भवनाला जात आहे. त्यावर संजय राऊतांनी कडवट प्रतिक्रिया दिली. शिंदे गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह हे वंदनीय आहेत. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला पण शिंदे सेनेकडून निषेधाचा एक शब्द नाही. शिंदे सेनेला बाळासाहेब वंदनीय नसल्याचे राऊत म्हणाले. शिंदे शिवसेना ही भाजपचं अंगवस्त्र आहे.किती दिवस रुसून बसणार असा सवाल त्यांनी केला. फारतर एखादी साडीचोळी पदरात पाडून घेतली असा जहरी टोला राऊतांनी लगावला. तर मुंबईचा महापौर हा भाजपचा होईल असा दावा त्यांनी केला.
फडणवीस महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घालतात
छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना विरोध करणं, महात्मा फुले यांच्या विचारांचा अपमान करणाऱ्यांना विरोध करणे हे जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संकुचित वाटत असेल तर मी त्यांना कोपरापासून दंडवत घालतो. घटनेचा खून, लोकशाहीचा खून, हत्या हे बाजूला ठेवा. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गमंत वाटते. अपमान करणाऱ्यांना जर ते पद्मभूषण देत असतील तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला काय बोलावं असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राचा अपमान कोश्यारी यांनी केला होता. त्यावेळी फडणवीस यांनी त्यांच्या बाजूने सारवासारव केली. दिल्लीनेच त्यांच्यावर ही सारवासारव करण्याची जबाबदारी दिल्याचा टोला राऊतांनी लगावला. काल मंत्री गिरीश महाजन हे यांनी तिची परंपरा जपली अशी टीका त्यांनी केली.
उदय सामंत हे भाजपवासी होणार?
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अंबादास दानवे यांना शिंदे सेनेत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा केला होता. त्यावर संजय राऊत यांनी सणसणीत प्रतिक्रिया दिली. अंबादास दानवे हे कडवड शिवसैनिका आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पक्षात आहेत. त्यांनी तीन-चार पक्ष बदले नाहीत. ते आमचे सहकारी आहेत. या दाव्यांना अर्थ नसल्याचे राऊत म्हणाले. तर स्वतः उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये चालले आहेत. दावोसमध्ये काय चर्चा झाली हे तुम्हाला माहिती आहे का, असा दावा त्यांनी केला. मागे सुद्धा राऊत यांनी असाच दावा केला होता.