Thane News : घोडबंदरवासियांसाठी गुड न्यूज, वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता, अवजड वाहनांना रात्री 12 नंतरच ” एंट्री”
घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रात्री 12 नंतरच जड वाहनांना घोडबंदर रोडवर प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दिवसाच्या वाहतूक कोंडीत काहीशी सूट मिळण्याची अपेक्षा आहे. सर्व संबंधित यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून वेळेचे बंधन न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत ही व्यवस्था लागू राहील.

ठाण्यातील अतिशय वर्दळीचा, गजबजलेला रास्ता असलेल्या घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होणं हे नित्याचंच आहे, त्यामुळे ठाणेकरांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. दिवसभरात लोकांना बराच वेळ या रस्त्य़ावर अडकून पडायला होतं. मात्र आता घोडबदरवासियांसाठी एक गुड न्यूज समोर आली असून लवकरच त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊ शकते. कारण आता, आजपासून घोडबंदर रोडवर अवजड वाहनांना रात्री 12 नंतरच एंट्री देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले असून जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त महापालिका आयुक्तांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशीरा सर्व यंत्रणांची बैठक घेतली. त्यामध्ये घोडबंदर रस्त्यावर रात्री बारानंतरच जड वाहने सोडण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी सर्व यंत्रणांना दिले.
वेळेचं बंधन न पाळणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
दरम्यान रात्री बारापूर्वी जड वाहने सोडणाऱ्या आणि वेळेच बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश समन्वय समितीचे अध्यक्ष व ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले आहेत.
घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडीमुळे तेथील नागरिकांना त्रास होत असतो.. त्यांची या त्रासातून मुक्तता करणे हे अतिशय महत्वाचे असून घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांना दिल्या. त्यासाठी वाढीव मनुष्यबळाची आवश्यकता असेल तर त्याचे नियोजन करण्यासही सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॅा. श्रीकृष्ण पांचाळ यांना ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई पोलिस आयुक्त, पालघर जिल्हाधिकारी, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक, मीरा भायंदर पोलिस आयुक्त, मीरा भायंदर महापालिका आयुक्त यांच्याशी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी जेएनपीटीकडून घोडबंदर रस्त्यावर येणारी वाहने रात्री १२ नंतरच सोडण्याच्या सूचना जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक उन्मेष वाघ यांना दिल्या तसेच याबाबत नियोजन करण्याबाबत नवी मुंबईचे वाहतूक पोलिस उपायुक्त काकडे यांना सांगितले.
त्याचबरोबर मीरा भायंदरचे पोलिस आयुक्त निकीत कौशिक, मीरा भायंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक देशमुख यांना दूरध्वनीवरून अहमदाबादकडून घोडबंदर रोडकडे येणारी वाहनेही रात्री 12 नंतर सोडण्यात यावी अशा सूचना दिल्या. त्याबरोबर या जड वाहनांसाठी आच्छाड आणि चिंचोटी या ठिकाणी पार्किगची व्यवस्था करून जड वाहनांचे नियोजन करावे असे सांगितले. या सर्व यंत्रणाच्या समन्वयाची जबाबदारी शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी पांचाळ यांच्यावर सोपविली असून यामध्ये वेळेचे बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
या बैठकीला ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, वाहतूक पोलिस शाखेचे उप आयुक्त पंकज शिरसाट, पोलिस उप आयुक्त प्रशांत कदम आणि जस्टीस फॅार घोडबंदर रोडचे पंकज सिन्हा, गिरीष पाटील आणि ऍड. राधिका राणे आदी उपस्थित होते.
घोडबंदवासियांचा रास्ता रोको
दरम्यान रोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून घोडबंदरवासियांनी रास्तारोको केला. बोरवली ते ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनाचा नागला बंदर ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. रस्त्यावरती पडलेला खड्ड्यांपासून आजादी द्या, अशा प्रकारचे नारे देण्यात आले. तसेच ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
