औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा कुणाकडे? सरकार ती हटवू शकते? नागपूर हिंसेनंतर चर्चेचे तुफान
Aurangzeb Grave Security : नागपूर हिंसेनंतर औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरत आहे. पण त्यात कायदेशीर अडचणी आहेत. कुणाकडे आहे या कबरीची सुरक्षा? कबरीची तोडफोड झाल्यास काय होऊ शकते शिक्षा?

इतिहासातील क्रूरकर्मा मुघल बादशाह औरंगजेब याच्या कबरीवरून राज्यात वाद वाढला आहे. त्याची कबर हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असतानाच काल एका समुदायाने केलेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यात उमटले आहेत. दंगेखोरांना सोडणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला आश्वासन दिले आहे. नागपूर हिंसाचारात पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना टार्गेट करण्यात आले आहे. अनेक वाहनं जाळण्यात आली आहे. एका गटाने नियोजनपूर्ण हल्ला चढवल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरत आहे. पण त्यात कायदेशीर अडचणी आहेत. कुणाकडे आहे या कबरीची सुरक्षा? कबरीची तोडफोड झाल्यास काय होऊ शकते शिक्षा?
औरंगजेबाचा पुळका कशासाठी?
काल हिंदुत्ववादी संघटनांनी नागपूरमध्ये औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली. आंदोलकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर दुसरीकडे हिंदुत्ववाद्यांनी पवित्र ग्रंथ जाळल्याची अफवा उठली. नमाजनंतर एका गटाने दगडफेक केली . याविषयीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात दिले. औरंगजेबाची कबर जाळल्याचे पडसाद उमटले की अफवेचे हे तपासाअंती समोर येईल. पण सत्ताधारी यासर्व घटनेमुळे संतापले आहेत. औरंगजेब हा काय संत लागून गेला काय अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.




पुरातत्त्व खात्याकडे सुरक्षेची जबाबदारी
क्रुरकर्मा औरंगजेब मराठ्यांना संपवण्यासाठी दख्खनमध्ये आला. 27 वर्षे मराठ्यांनी त्याला झुंजवले. अखेर हताश औरंगजेब अहिल्यानगर जवळ मेला. त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या गुरूच्या कबरीजवळच त्याची कबर करण्यात आली. कबर अत्यंत साधी असावी असा त्याचा आग्रह होता. पण नंतर त्याच्या कबरीचे सुशोभिकरण करण्यात आल्याचे दिसते.
तर औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित आहे. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पुरातत्त्व खात्याकडे (ASI) आहे. वारसास्थळाच्या संरक्षणाविषयी घटनेच्या अनुच्छेद 42, 51 ए (एफ) मध्ये करण्यात आला आहे. केंद्र सरकार कोणत्याही वास्तूला राष्ट्रीय वारसास्थळ म्हणून घोषीत करू शकते. एएसआयकडे देशातील सर्वच वारसास्थळांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे.
औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी काय तरतूद?
सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ अश्विनी कुमार दुबे यांच्यानुसार, अशा वास्तूंच्या सुरक्षेची जबाबदारी ही राज्य सरकारची असते. राज्य सरकार कोणत्याही प्रकारची हिंसक कारवाई, तोडफोड, आग लावणे अशा घटना थोपवण्यासाठी पाऊल टाकू शकते. तर असे कृत्य करणाऱ्यांविरोधात कारवाई करू शकते. दंगेखोरांवर कारवाईचे अधिकार राज्य सरकारकडे असतात.
महाराष्ट्रातील हिंसाचार थांबवणे, दंगेखोरांवरील कारवाई तर औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची असते, असे दुबे यांनी स्पष्ट केले. तर एएसआयच्या सुरक्षित वास्तूमध्ये एखाद्या वारसास्थळाचे नाव कमी करायचे असेल तर त्यासाठी एक प्रक्रिया आहे. एएसआयच्या प्रक्रियेतूनच हे वारसास्थळ हटवणे आवश्यक आहे.

औरंगजेबाची कबर कुणाच्या अख्त्यारित
वारसास्थळाला नुकसान झाल्यास शिक्षेची तरतूद
ज्येष्ठ विधीज्ञ अश्विनी कुमार दुबे यांच्यानुसार, भारतीय न्याय संहितेत वारसास्थळाला नुकसान झाल्यास त्याच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार, वारसास्थळाला आग लावणे, त्याची तोडफोड केल्यास कमीत कमी एक वर्षाचा तुरूंगवास आणि दंडाची तरतूद आहे. तर जास्तीत जास्त पाच वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. नुकसानीनुसार शिक्षेची तरतूद आहे.
या कलमान्वये शिक्षा
भारतीय न्याय संहितेचे कलम 189 अंतर्गत बेकायदेशीर जमावविरोधात कारवाई होते. कलम 190 नुसार बेकायदेशीर सभा घेणार्यांवर कारवाई करण्यात येते. याशिवाय कलम 115 अंतर्गत दंगलीत इजा पोहचवणे, कलम 103 नुसार दंगलीतील हत्या घडवणे, कलम 61 नुसार दंगलीचा कट रचणे यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तर न्याय संहितेत कलम 299 नुसार, धार्मिक बाबीवरून दुखावल्याप्रकरणी शिक्षेची तरतूद आहे.
दंगल हा एक अजामीनपात्र गुन्हा
न्याय संहितेनुसार, दंगल घडवल्यास 191 (1) (2) (3) अंतर्गत शिक्षेची तरतूद आहे. जर सभेनंतर हिंसा भडकली तर सभेतील सर्व सदस्यांना दोषी मानण्यात येते. त्यांना शिक्षा सुनावण्यात येते. भारतीय न्याय संहितेच्या कलम 191 मध्ये दंगल हा अत्यंत गंभीर गुन्हा मानण्यात येतो. तो एक दखलपात्र गुन्हा आहे. पोलीस आरोपीला या गुन्ह्यात तात्काळ अटक करू शकतात. याशिवाय हा अजामीनपात्र गुन्हा आहे. यामध्ये आरोपीला अटक केल्यानंतर जामीनावर सोडता येत नाही.