
काल नारायणगडावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे अनेक मागण्या केल्या. ओबीसी आरक्षण आणि शेतकऱ्यांना मदत यासंदर्भातील या मागण्या होत्या. त्यात त्यांनी सारख्या आडनावावरून कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेवर भाष्य केले होते. एकसारखे आडनाव असेल तर अशा बांधवाला फोन करा. तुमची भावकी,नातेसंबंध,कुळ एक आहे. कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) असेल तर त्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेत अर्ज करा असे आवाहन जरांगेंनी काल केले होते. त्यावर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मोठा सवाल केला.
तर मग खुल्या वर्गातील लोकांना फायदा
गावातील एकाच आडनावाच्या व्यक्तींना प्रमाणपत्र द्या अशी काल मागणी जरांगेंनी केली होती. त्यावर तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली. असे मुद्दे उपस्थित करून जरांगे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. एका गावात सारख्या आडनावाचे मात्र वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात. त्यामुळे सारखे आडनाव असताना चौकशीविना प्रमाणपत्र देणे योग्य ठरणार नाही, असे मत तायवाडे यांनी व्यक्त केले. सारख्या आडनावाच्या मात्र वेगवेगळ्या जातीचे लोक महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात. अशाने तर खुल्या वर्गातील व्यक्ती सुद्धा कुणबी म्हणून प्रमाणपत्र घेऊन जाईल, असा सवाल त्यांनी जरांगे यांना केला.
पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा
मराठा आणि ओबीसी समाजातील 90 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. महाराष्ट्रातील सध्याच्या अतिवृष्टीमुळे हे सर्व लोक मोठ्या संकटात सापडले आहे. म्हणून सरकारची जबाबदारी आहे, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून आर्थिक मदत करावी असे ते म्हणाले. सरकारकडून मदतीचा पहिला हप्ता मिळण्याची आम्ही वाट पाहत आहोत, असे तायवाडे यांनी सांगितले.
हा तर नवीनच मुद्दा
जरांगे यांनी शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीची राज्यभरात चर्चा सुरु आहे. त्यावर तायवाडे यांनी सुद्धा मत व्यक्त केले. शेतीला नोकरीचा दर्जा देणे, हा नवीनच मुद्दा आहे, आम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. ते कोणत्या आधारावर असे बोलले मला माहित नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
ओबीसी बैठकीला जाणार
ओबीसी बैठकीचे निमंत्रण मिळाले आहे. आमच्या दहा जणांच्या शिष्टमंडळाला उद्या दुपारी एक वाजता सह्याद्री सभागृह मध्ये बोलावले आहे. मात्र अजून विषय पत्रिका आलेली नाही. त्यामुळे कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होईल हे अजून स्पष्ट नाही, म्हणून जास्त वक्तव्य करू शकत नाही.
सरकार उद्याच्या बैठकीत काढलेल्या जीआर संदर्भात आपली भूमिका मांडेल. त्यामुळे ज्या नेत्यांच्या मनामध्ये जीआर बद्दल शंका आहे, त्याचा निराकरण करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल.. त्यातून त्यांचे समाधान होतो की नाही हे स्पष्ट होईल. त्यांचे समाधान झालं नाही, तर काय भूमिका घ्यायची, हा त्यांचा प्रश्न आहे.. मात्र आमचे समाधान आधीच झाल्याचे तायवाडे यांनी स्पष्ट केले.
हैदराबाद गॅझेटविषयी चिमटा
ज्या दिवशी मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं, तेव्हापासून आजपर्यंत ते सांगत होते की हैदराबाद गॅझेट लागू झाले. संपूर्ण महाराष्ट्राने ते ऐकलं आहे. आता पुन्हा दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅझेट लागू करा असं म्हणणं किती अतिशयोक्तीचे आहे. नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे हेच समजत नाही. त्यांच्या वक्तव्यांमध्ये विरोधाभास आहे, असे मत तायवाडे यांनी व्यक्त केले.