
Devendra Fadnavis in Final Week Proposal: आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेले हिवाळी अधिवेशन ना मुद्दांनी तापले ना गोंधळांनं. नागपूरच्या गुलाबी थंडीत पुरवण्या मंजूर करण्याइतपत कामकाज झालं असा विरोधकांचा सूर होता. आज अधिवेशनाचे सूप वाजण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सेवा है यज्ञकुंड समीधासम हम जले’ असच जणू गीत गायलं. महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनीच ‘समीधा’ अर्पण करण्याचे आवाहन केलं. अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करताना फडणवीसांचे कवी मन रुंजी घालताना दिसले. सरकार स्थापन्यापूर्वी त्यांनी ‘बदला नही, बदलाव होगा’ असा नारा दिला होता. आता त्यांनी एका शेरातून राजकारणातील पुढची दिशा स्पष्ट केली. त्याची विरोधकांमध्ये सुद्धा चर्चा झाली.
अब आगे बढ़ चुका हूं मैं…
अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाचे आणि त्यांच्या सरकारचे धोरणच नाही तर त्यांच्या मनातील हेतू सुद्धा उघड केला. त्यांनी मनोगत व्यक्त करतानाच एक खास शेर पेश केला.
“अब आगे बढ़ चुका हूं मैं. पिना था जितना जहर पी चुका हूं मैं. अब पग नही रूकने वाले. चल चुका हूं मैं. जितना पढना था तुमको, पढ चुका हूं मैं, अब आगे बढ चुका हूं मैं.”
असं स्वगतच जणू मुख्यमंत्र्यांनी मांडले. त्यावेळी त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पण बसलेले होते. त्यांनी एकाच शेरातून मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. त्याचवेळी मित्र पक्षांना आणि विरोधकांना, मी तुम्हाला पुरता ओळखून आहे, हे सांगायला ही ते जणू विसरले नाहीत. आता यापुढे काय हे पण त्यांनी जाहीर केले. तुमचा राग मनात न ठेवता पुढे जाणार असल्याचेही त्यांनी या शेरमधून सांगितले. तर त्याचवेळी कोणीतरी सभागृहात या शेरवरून चिमटा काढला. तेव्हा मी नागपूरमधून मुंबईकडे समृद्धी हायवेने पुढे गेल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी सभागृहातील वातावरण हलकंफुलकं केलं.
महाराष्ट्र आता थांबणार नाही
अंतिम आठवडा प्रस्तावावर म्हणणं मांडताना मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीत तळागळ्यातील कार्यकर्त्यांना निवडणुकीमुळे संधी मिळाल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून निवडणुका न झाल्याने त्यांची नाराजी होती. पण आता निवडणुकीमुळे त्यांना ही लोकशाही प्रक्रियेचा भाग होता येईल यावर त्यांनी जोर दिला. तर आता महाराष्ट्र थांबणार नाही. राज्याचा विकास होत राहणार असे आश्वासन दिले. याचवेळी राज्याचा कोणताही निर्णय असो तो महायुतीतील नेते मिळून घेतात असा संदेश द्यायला ते विसरले नाहीत.
मुंबई तोडली जाणार नाही
मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशी कोणतीही शंका कुणीही आणू नये. कारण निवडणुका आल्या की अशा शंका घेण्यात येतात असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. मुंबई कालही महाराष्ट्राची होती. आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला आश्वासन दिले. आपले दैवत छत्रपती शिवरायांनी जो मार्ग आपल्याला दाखवला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गानेच हा महाराष्ट्र चालत राहिल असे त्यांनी स्पष्ट केले.