नवनीत राणा यांचा प्लान बी तयार, निवडणूक आयोगाला पत्र; अमरावतीत काय घडणार?

| Updated on: Mar 15, 2024 | 7:59 PM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत फक्त भाजपच्याच उमेदवारांची नावे आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अद्याप भाजपने तिकीट दिलेलं नाही. नवनीत राणा या भाजपमध्ये जाणार अशी चर्चा असताना राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाने मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र दिलं आहे. या पत्रात एक महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे.

नवनीत राणा यांचा प्लान बी तयार, निवडणूक आयोगाला पत्र; अमरावतीत काय घडणार?
navneet rana
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अमरावती | 15 मार्च 2024 : भाजपने महाराष्ट्रातील 20 लोकसभा मतदारसंघाची यादी जाहीर केली आहे. त्यात जुन्यांबरोबर नव्यांनाही संधी दिली आहे. मात्र, ज्या जागांवरून तेढ आहे, त्या जागांवर भाजपने अद्यापही उमेदवार दिलेला नाही. येत्या एक दोन दिवसात हा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ज्या जागांवर तिढा आहे, त्या ठिकाणच्या विद्यमान खासदार आणि इच्छुकांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे. त्यामुळेच या विद्यमान खासदार आणि इच्छुकांनी आपआपला प्लान तयार करण्यास सुरुवात केली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बी प्लान तयार केला आहे.

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. भाजप आपल्याला अमरावतीची जागा सोडेल असं त्यांना वाटत होतं. पण भाजपने पहिल्या यादीत अमरावतीची जागा जाहीर केलेली नाही. अमरावतीच्या जागेसाठी शिंदे गट आडून बसला आहे. अमरावतीवर नेहमी शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. भाजपचा संबंध नाही, त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा होराच शिंदे गटाने लावला आहे. तर दुसरीकडे नवनीत राणा यांनीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी घेऊन अमरावतीची जागा सोडण्याची विनंती केली आहे. मात्र, भाजपने याबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही.

सावध पावलं

दुसरीकडे नवनीत राणा या भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण नवनीत राणा भाजपमध्ये आल्या तरी अमरावतीची जागा आम्हालाच सोडली पाहिजे, असा आग्रह शिंदे गटाने धरला आहे. त्यामुळे नवनीत राणा भाजपमध्ये जाणार की नाही? गेल्यास त्यांना तिकीट मिळणार की नाही? याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. त्यामुळेच नवनीत राणा यांनी सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे.

शिट्टी किंवा कुकर द्या

या सर्व पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष दुसरा पर्याय शोधत आहे. भाजपमधून कमळ चिन्हावर निवडणूक न लढल्यास दुसरा पर्याय म्हणून युवा स्वाभिमान पक्षाच्या चिन्हाच्या पर्यायांची नवनीत राणांकडून चाचपणी केली जात आहे. त्यासाठी राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्षाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. या पत्रातून निवडणुकीसाठी दहा चिन्ह सूचवण्यात आले आहेत. पाना, शिट्टी, टीव्ही, बॅट, कुकर, फुटबॉल, रोडरोलर, गॅस सिलिंडर, ऑटोरिक्षा, कैची यापैकी एक निवडणूक चिन्ह म्हणून देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.