नाशिकमध्ये भीषण अपघात! मद्यधुंद चालकाने शाळकरी विद्यार्थ्यांना उडवलं; एकाचा मृत्यू, 12 जखमी
मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकमधील चांदवडजवळ भीषण अपघात झाला आहे. एका छोटा हत्ती टेम्पोने शाळकरी विद्यार्थ्यांना उडवलं आहे. या धडकेत बारा ते तेरा शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकमधील चांदवडजवळ भीषण अपघात झाला आहे. एका छोटा हत्ती टेम्पोने शाळकरी विद्यार्थ्यांना उडवलं आहे. या धडकेत बारा ते तेरा शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले आहेत. यातील एकाचा मृत्यू झाला असून 5 विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक आहे. शाळा सुटल्यानंतर मुंबई-आग्रा महामार्ग ओलांडताना हा अपघात झाला आहे.
13 विद्यार्थी जखमी
समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडजवळ असणाऱ्या सोग्रसमध्ये या वाहनाने शाळकरी मुलांना धडक दिली. या अपघातावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती समोर आली आहे. या अपघातात 12-13 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना चांदवड येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्वांवर उपचार सुरु आहेत.
रुग्णालयात जमली मोठी गर्दी
या अपघातावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे नाशिक वरून मालेगावकडे जात होते, मात्र अपघाताची माहिती मिळताच त्यांनी चांदवड येथे शासकीय रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि वाहन चालकावर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. सध्या जखमी विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळत आहे.
स्पीड बेकर व झेब्रा कॉस क्रॉसिंग बनवणार – दादा भुसे
याबाबत बोलताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटले की, चांदवड तालुक्यातील सोग्रस येथे दुर्दैवी अपघात झाला. यात तेरा मुलं मुली जखमी झाले आहे. या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांची मागणी एक उड्डाणपूल झाला पाहिजे. आता तात्काळ स्पीड बेकर झेब्रा कॉस क्रॉसिंग दोन दिवसाच्या आत केले जाईल. विद्यार्थ्यांचा शाळेचे वेळ असतो त्यावेळी जाण्यासाठी सुविधा करून दिल्या जातील.
मृत विद्यार्थ्यांचा पालकांना 4 लाखांची मदत
पुढे बोलताना दादा भुसे म्हणाले की, ‘जे काही विद्यार्थी जखमी झाले असे संदर्भात संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे. सर्व जखमींचा खर्च शासनाच्या वतीने केला जाईल. दुर्दैवाने यामध्ये एक जण मृत्युमुखी पडला आहे. त्याच्या पालकांना शासनाच्या वतीने चार लाख रुपये मदत देण्याची घोषणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.’
