Nashik Corona| येवल्यात विद्यार्थ्याला कोव्हॅक्सीन ऐवजी दिली कोविशील्ड लस; नमनाचा नारळ गोंधळाने फुटला…!

Nashik Corona| येवल्यात विद्यार्थ्याला कोव्हॅक्सीन ऐवजी दिली कोविशील्ड लस; नमनाचा नारळ गोंधळाने फुटला...!
Vaccination

नाशिकमध्ये 6 ठिकाणी आणि जिल्ह्यात एकूण 39 लसीकरण केंद्रांवर किशोरवयीन मुलांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरणासाठी शहरी भागात 11 केंद्रे ठेवण्यात आली आहेत.

उमेश पारीक

| Edited By: मनोज कुलकर्णी

Jan 03, 2022 | 2:05 PM

येवलाः नाशिक जिल्ह्यात सोमवारपासून 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांचे कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, येवला तालुक्यातील पाटोदा येथे एक धक्कादायक प्रकार घडला, असून या महत्त्वकांक्षी लसीकरणाच्या नमनाचा नारळ गोंधळाने फुटला आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याला कोव्हॅक्सीनऐवजी चक्क कोविशील्ड लस देण्यात आली. त्यामुळे पालक संतप्त झाले असून, प्रशासनाची पाचावर धारण बसलीय.

भोंगळ कारभार

गेल्या पावणेदोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शाळा आणि कॉलेज बंद होते. आता कुठे तरी शाळा कॉलेज सुरू झाले असून, त्यात आता कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराने रुग्ण संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार आता दक्ष झाले आहेत. कोरोना विषाणूचे संक्रमण वाढू नये म्हणून आजपासून सर्वत्र 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरू झाले. शासनाने या मुलांना कोव्हॅक्सिन ही लस देण्याचे सांगितले आहे. मात्र, येवला तालुक्यातील पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 16 वर्षे वयाच्या अथर्व पवार यास कोव्हॅक्सिनऐवजी कोविशील्ड लस दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

कारवाईची मागणी

तालुक्यातील आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभाराने पालक धास्तावले आहेत. याप्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करण्याची मागणी अथर्वचे वडील वसंत पवार यांनी केली आहे. दुसरीकडे आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या आरोग्य सेविकेने चुकून हा प्रकार केल्याची कबुली तालुका आरोग्य अधिकारी हर्षल नेहते यांनी दिली आहे. मात्र, संबंधितांवर काय कारवाई करणार याबाबत त्यांनी मौन बाळगले. शिवाय मी चौकशीसाठी आल्याचे सांगून वेळ मारून नेली. दरम्यान, सध्या लसीकरण झालेल्या अथर्वची तब्येत व्यवस्थित आहे.

येथे सुरू लसीकरण

नाशिकमध्ये 6 ठिकाणी आणि जिल्ह्यात एकूण 39 लसीकरण केंद्रांवर किशोरवयीन मुलांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरणासाठी शहरी भागात 11 केंद्रे ठेवण्यात आली आहेत. त्यात नाशिक महापालिका हद्दीत 6 आणि मालेगाव महापालिका हद्दीत 5 केंद्रे असणार आहेत. तर 29 केंद्र हे ग्रामीण भागात असणार आहेत. गरज पडल्यास प्रत्येक महाविद्यालयातही लसीकरण करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये इंदिरा गांधी रुग्णालय, सातपूर ईएसआय हॉस्पिटल, सिडको समाज कल्याण कार्यालय, नवीन बिटको हॉस्पिटल आणि झाकीर हुसैन हॉस्पिटल या केंद्रावर सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत लसीकरण सुरू असेल. प्रत्येक केंद्रावर 500 डोस उपलब्ध आहेत.

इतर बातम्याः

Nashik Corona| कोरोना लस घेतल्याशिवाय सप्तश्रृंगीचे दर्शन नाही; इतरही नियम कडक, जरूर जाणून घ्या…!

Nashik Corona|नाशिकमध्ये कोरोना रुग्णांचा गुणाकार; अत्यंत झपाट्याने वाढ, आजची संख्या…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें