Nashik Corona | तब्बल 40 हजार किशोरवयीन मुलांनी घेतला पहिला डोस; तुमच्या लेकरानं लस घेतलीय का?
किशोरवयीन मुलांच्या लसीकरणासाठी शहरी भागात 11 केंद्रे ठेवण्यात आली आहेत. त्यात नाशिक महापालिका हद्दीत 6 आणि मालेगाव महापालिका हद्दीत 5 केंद्रे आहेत.

नाशिकः नाशिकमध्ये झपाट्याने वाढणारे कोरोना (Corona ) रुग्ण पाहता आजपर्यंत गेल्या पंधरा दिवसांत जवळपास 40 हजार किशोरवयीन मुलांचे लसीकरण झाल्याचे समोर आले आहे. शहरात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू आले आहे. त्यासाठी नाशिकमध्ये 6 ठिकाणी आणि जिल्ह्यात एकूण 39 लसीकरण केंद्रांवर या मुलांचे लसीकरण केले जात आहे. अनेक महाविद्यालयामध्ये जातही लसीकरण सुरू आहे. या विद्यार्थ्यांना 28 दिवसानंतर कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.
येथे सुरू लसीकरण
किशोरवयीन मुलांच्या लसीकरणासाठी शहरी भागात 11 केंद्रे ठेवण्यात आली आहेत. त्यात नाशिक महापालिका हद्दीत 6 आणि मालेगाव महापालिका हद्दीत 5 केंद्रे आहेत. तर 29 केंद्र हे ग्रामीण भागात असणार आहेत. गरज पडल्यास प्रत्येक महाविद्यालयातही लसीकरण करण्यात येत आहे. नाशिकमध्ये इंदिरा गांधी रुग्णालय, सातपूर ईएसआय हॉस्पिटल, सिडको समाज कल्याण कार्यालय, नवीन बिटको हॉस्पिटल आणि झाकीर हुसैन हॉस्पिटल या केंद्रावर ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी सकाळी सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत लसीकरण सुरू आहे, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
12 हजार 759 रुग्ण
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 14 हजार 548 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 12 हजार 759 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 772 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 327, बागलाण 88, चांदवड 105, देवळा 77, दिंडोरी 277, इगतपुरी 238, कळवण 92, मालेगाव 83, नांदगाव 238, निफाड 697, पेठ 19, सिन्नर 326, सुरगाणा 26, त्र्यंबकेश्वर 65, येवला 112 असे एकूण 2 हजार 770 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 9 हजार 458, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 228 तर जिल्ह्याबाहेरील 303 रुग्ण असून, असे एकूण 12 हजार 759 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 36 हजार 079 रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 95.71 टक्के, नाशिक शहरात 94.57 टक्के, मालेगावमध्ये 95.53 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 93.89 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 95.06 टक्के आहे. नाशिक ग्रामीणमध्ये आजपर्यंत कोरोनाने 4 हजार 253 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 35, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 772 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्याचे चित्र
– 4 लाख 36 हजार 079 एकूण कोरोनाबाधित.
– 4 लाख 14 हजार 548 रुग्ण पूर्णपणे बरे.
– सध्या जिल्ह्यात 12 हजार 759 पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 95.06 टक्के.
इतर बातम्याः
Nagar Panchayat Election result 2022 : केंद्रीय मंत्री भारती पवारांना आमदार दिराची धोबीपछाड