
ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा वाढली आहे. नाशिक जिल्ह्यास भुजबळ यांच्या माध्यमातून चौथे मंत्रिपद मिळाले आहे. त्यातच शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्ष या जिल्ह्यात आपला दावा पालकमंत्री पदावर करत आहे. नाशिकमध्ये आगामी कालावधीत सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्रीपद महत्वाचे असणार आहे. आता भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यापैकी कोणाकडे नाशिकचे पालकत्व जाणार? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. परंतु तिन्ही पक्ष नाशिकसाठी आपला दावा मजबूत करत आहेत.
नाशिक जिल्ह्यातून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषधमंत्री नरहरी झिरवाळ आणि छगन भुजबळ हे चौघे कॅबिनेट मंत्री आहेत. भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात येण्याची शक्यता आहे. मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री पद मिळावे, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पालकमंत्री कोण होणार? हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी गिरीश महाजन हवे आहेत. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सरदार म्हणून गिरीश महाजन ओळखले जातात. त्यांनी संकटमोचकाची भूमिका अनेक वेळा पार पाडली आहे. तसेच नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा आणि अन्य कामांवर तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. नाशिकमधील मागील कुंभमेळ्याच्या वेळी गिरीश महाजन सिंहस्थ कुंभमेळा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री होते. त्यामुळे भाजप पुन्हा गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकत्व देण्यास उत्सुक आहेत.
18 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील फडणवीस सरकारमधील पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना दिले होते. परंतु शिवसेनेच्या विरोधानंतर त्या निर्णयास स्थगिती देण्यात आली. नाशिकमधील शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी दावा केला होता. आता या दाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांची भर पडणार आहे.
राज्य सरकारमधील मंत्र्यांकडे एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले म्हणजे त्या जिल्ह्याची जबाबदारी त्या मंत्र्यावर दिली जाते. शासकीय योजना, शासकीय समारंभ, बैठका याच्या केंद्रस्थानी पालकमंत्री असतात. त्यामुळे त्यांना त्या जिल्ह्याचे ‘पालक’ म्हटले जाते.