छगन भुजबळांना मंत्रिपद, आता धनंजय मुंडे यांचे पाच वर्ष कमबॅक नाही? काय मिळतात संकेत?
Maharashtra cabinet expansion : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. परंतु त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी मंत्रिपदाची दारे बंद झाल्याचे संकेत मिळत आहेत.

धनंजय मुंडेImage Credit source: TV 9 Marathi
Dhananjay Munde Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर विजनवासात गेलेले छगन भुजबळ पुन्हा मंत्री होणार आहे. त्यांना मंत्रिमंडळात धनंजय मुंडे यांची जागा आणि खाते देण्यात येत आहे. यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर विरोधकांच्या निशाण्यावर असलेले धनंजय मुंडे यांचे पाच वर्ष मंत्रिमंडळात कमबॅक होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहे.
या कारणांमुळे मुंडेंसमोर अडचण
- राज्याच्या मंत्रिमंडळात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या खात्यातील सर्व मंत्रिपद भरले आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार राष्ट्रवादीतून नवीन नेत्यास मंत्रिपदाची संधी मिळणे अवघड आहे. पर्यायाने धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात इनकमिंग होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
- धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश सुरुवातीपासून वादात आला होता. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित असलेल्या वाल्किम कराड याचे धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांना मंत्रीपद देऊ नये, अशी मागणी विरोधकांकडून फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ करण्यात आली होती. परंतु त्यानंतरही राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात चौफर झालेल्या टीकेमुळे धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मग त्यांचे रिक्त झालेले खाते अजित पवार सांभाळत होते.
- धनंजय मुंडे यांचे पुन्हा मंत्रिमंडळात समावेश न होण्याचे दुसरे महत्वाचे कारण करुणा शर्मा प्रकरण आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा दावा करत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबईतील माझगाव सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात न्यायालयात धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांचा मुलांचा सांभाळ करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु करुणा शर्मा यांना पत्नीचा दर्जा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन लाख रुपये पोटगी करुणा शर्मा यांना देण्याचे आदेश दिले होते.
- माझागाव कोर्टातील खटला जिंकल्यानंतर करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक आहे. आता त्यांनी विधानसभा निवडणुकीत खोटे शपथपत्र धनंजय मुंडे यांनी दाखल केल्याची तक्रार केली आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांची आमदारकी जाण्याचा धोका आहे. यामुळेही धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाची दारे बंद करण्यात आली आहे, अशी शक्यता आहे.
- धनंजय मुंडे यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. यामुळे त्यांना पुन्हा पक्षात संधी मिळणार नाही, असे म्हटले जात आहे.
- अजित पवार सोमवारी बीड दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांच्यासोबत धनंजय मुंडे दिसले. वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास कामांचा आढावा अजित पवार यांनी घेतला, तेव्हा धनंजय मुंडे त्यांच्यासोबत होते. बॅकफूटवर गेलेले धनंजय मुंडे सोमवारी अजित पवार यांच्या बीड दौऱ्यात पुन्हा अॅक्टिव्ह झाल्याचे चित्र दिसत होते. त्यानंतर सोमवारी रात्रीच धनंजय मुंडे यांच्या जागेवर छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्याची बातमी आली. त्यामुळे अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.