नाशिक : राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना चॅलेंज दिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी नुकतंच मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलं होतं. एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रिपदाचा तसेच आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि वरळीतून आपल्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवावी, असं चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी दिलं होतं. त्यांच्या या चॅलेंजवर शिंदे गटाकडून टीका करण्यात आली होती. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या या चॅलेंजला दोन दिवस होत नाही तेवढ्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा चॅलेंज देत डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आदित्य यांनी यावेळी मुख्यमंत्री घाबरले असल्याचं विधान केलंय. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या नव्या चॅलेंजवर एकनाथ शिंदे काय भूमिका मांडतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.