
महायुतीच्या जागावाटत सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे नाशिक… नाशिकच्या जागेवर कुणाला उमेदवारी दिली जाणार? याबाबत महायुतीत वारंवार खलबतं झाली. हेमंत गोडसे हे शिवसेना शिंदे गटाचे इथले विद्यमान खासदार आहेत. ते पुन्हा एकदा या ठिकाणाहून लढण्यासाठी इच्छुक होते. शिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक होते. तर भाजपकडूनही या जागेवर दावा केला जात होता. नाशकातून कुणाला उमेदवारी दिली जाणार? याची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच आज महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं आहे. गोडसेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होत आहे.
हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. नाराजीच्या चर्चांवर त्यांनी भाष्य केलं आहे. ठीक आहे हेमंत गोडसे यांचे नाव अपेक्षित आहे. हेमंत गोडसे सध्या विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या नावाचा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा केला होता. हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो. आतापासूनच प्रचाराला सुरुवात वेगात होईल, असं भुजबळ म्हणाले.
भारती पवार आणि हेमंत गोडसे यांचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रम उद्या होईल. देवेंद्र फडणवीस किंवा इतर काही नेते येण्याची शक्यता आहे. अर्ज भरताना मोठी मिरवणूक निघेल. संपूर्ण नाशिक मतदारसंघातील आणि दिंडोरी मतदार संघातील लोक या रॅलीला येतील. जेवढे महायुतीचे कार्यकर्ते आहेत सर्व एकत्र येतील. मिरवणुकीत सामील होतील, असं भुजबळांनी सांगितलं.
वेळ जरी कमी असला तरी हेमंत गोडसेंना नाशिक मतदारसंघात प्रत्येकाला माहिती आहे. दहा वर्षाचे खासदार होते. त्यामुळे त्यांचा प्रचार करणे सुद्धा सोपे जाईल. या पंधरा-सोळा दिवसात आम्ही पूर्णपणे ताकतीन प्रचाराचं काम करू. नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हेमंत गोडसे यांना आम्ही नाशिकमधून खासदार करून पाठवू, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.