महात्मा फुलेंना स्त्री शिक्षणाची प्रेरणा कोणापासून मिळाली? छगन भुजबळांचं उदयनराजेंना उत्तर
खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावर आता भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली होती, प्रतापसिंह महाराज यांनी आपल्याच राजवाड्यामध्ये स्त्रींयासाठी पहिली शाळा सुरू केली, त्यांचं अनुकरण महात्मा फुले यांनी केलं असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उदयनराजे यांना खोचक टेला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
आज पुणे येथे महात्मा फुले यांच्या वाड्यावर जाऊन अभिवादन केले, माझ्यासोबत चंद्रकांत पाटील देखील होते. सर्वच राजकीय मंडळी होती. आज आपण बघतोय, मोठ्या उत्साहात नाशिक येथे मिरवणूक निघाली आहे. मी जे काही वाचल आहे, त्याआधारे महात्मा फुले यांना स्त्री शिक्षणाची प्रेरणा ही थॉमस पेन आणि इतर जे जगातील फिलॉसॉफर्स आहेत त्याची पुस्तक वाचून मिळाली आहे. ‘उदयनराजे तो राजा है हम प्रजा है , हम उनके खिलाफ कैसे बात करेगे भाई’ असं म्हणत भुजबळ यांनी उदयनराजे यांना खोचक टोला लगावला आहे.
पुढे बोलातना ते म्हणाले की, पण मला एक माहिती आहे, पूर्वीचे राजवाडे आपल्या घरातील मुलांना शिकवण्यासाठी राजवाड्यामध्येच शिकण्याची व्यवस्था करत होते. सार्वजनिक रित्या नाही. १८५१ साली सार्वजनिक शाळा ब्रिटिशांकडे सुपूर्त करण्यात आली, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी ओबीसी आरक्षणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे, सध्या ओबीसी आरक्षणाची केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे, आम्ही स्वतः सुप्रीम कोर्टात वकील उभे केले आहेत. सुनावणी कधीही घ्या, आम्हाला त्याच्याशी कर्तव्य नाही. आमचं ओबीसीचं आरक्षण टिकले पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील उदयनराजेंवर निशाणा साधला आहे.