नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात वसलेल्या नांदूर मधमेश्वर अभयारण्यात (Nandur Madhameshwar sanctuary) लागलेल्या आगीमुळे (Fire) हजारो पाखरांचा जीव धोक्यात आला आहे. सोमवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही आग लागल्याचे समजते. परिसरात आगीने रौद्ररूप धारण केले आहे. अभयारण्यातील अधिकारी खासगी क्षेत्रात आग लागल्याचे म्हणत आहेत. मात्र, पंचक्रोशी गावकऱ्यांनी ही आग अभयारण्यात लागल्याचे म्हटले आहे. या आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. चापडगाव आणि मांजरगावच्या शिवारात ही आग लागल्याचे समजते. पक्षीनिरीक्षण केंद्रापासून सुमारे साडेतीन ते चार किलोमीटरवर ही आग आहे. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवता आले नव्हते. दरम्यान, आज मंगळवारी सकाळी काही कर्मचारी ही आग नेमकी कुठे लागली आहे, ते पाहायला गेल्याचे वृत्त आहे. ही आग वाढली तर अभयारण्यातील हजारो पक्षांना याचा धोका होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.