Video | मायबाप सरकार जागे व्हा, लोडशेडिंगमुळे येवल्यात उभ्या पिकावर नांगर, पाणी असूनही वीज नाही…!
मायबाप सरकार जागे व्हा. कधी दुष्काळामुळे पोटावर लाथ मारली जाते, तर कधी व्यवस्था देशोधडीला लावते. यंदा पावसाने कहर केला. नद्या, नाले ओसंडून वाहिले. शेतातल्या विहिरी तुडुंब आहेत, पण भरले पीक डोळ्यांसमोर जळतेय. हे पाहून तरी लोडशेडिंग रोखण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी आर्त विनवणी शेतकरी करतायत.

येवलाः नाशिक (Nashik) जिल्ह्याला भारनियमनाचा (loadshedding) मोठा फटका सहन करावा लागतोय. त्याचा परिणाम थेट शेतीवर होत आहे. विहिरीत पाणी आहे, पण वीजपुरवठा नसल्याने ते पिकांना देता येत नाही, अशी शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. अनेक ठिकाणी फक्त एकेक तास वीजपुरवठा होत आहे. या परिस्थितीला कंटाळून येवला तालुक्यातील ठाणगाव येथील संतप्त शेतकऱ्याने (farmer) दीड एकरावरील पीक जाळून टाकले आणि त्यावरून नांगर फिरवल्याची घटना घडलीय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांमध्ये दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे. सध्या कांद्याचे सर्वसाधारण बाजार भाव सहाशे ते सातशे रुपयांपर्यंत खाली आलेला असताना दुसरीकडे एकच तास वीज मिळत असल्यामुळे पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. मायबाप सरकार जागे व्हा. कधी दुष्काळामुळे पोटावर लाथ मारली जाते, तर कधी व्यवस्था देशोधडीला लावते. यंदा पावसाने कहर केला. नद्या, नाले ओसंडून वाहिले. शेतातल्या विहिरी तुडुंब आहेत, पण भरले पीक डोळ्यांसमोर जळतेय. हे पाहून तरी लोडशेडिंग रोखण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी आर्त विनवणी शेतकरी करतायत.
पाणी असूनही फरफट
येवला तालुक्यातील ठाणगाव येथील सागर शेळके या तरुण शेतकऱ्याने एक लाख रुपये खर्च करून कांद्याचे पीक घेतले होते. मात्र, एकच तास वीजपुरवठा सुरू आहे. त्यामुळे पिकाला पाणी असूनही देता येत नाही. त्यात उन्हाच्या वाढत्या कडाक्यामुळे पीक वाळत होते. हे पाहून संतप्त झालेल्या शेतकऱ्याने पूर्ण पीक जाळून त्यावरून नांगर फिरवला. वीज पुरवठा होत नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले.
लोडशेडिंगमुळे येवल्यात उभ्या पिकावर फिरवला नांगर…! pic.twitter.com/HI7G5YOkfI
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 12, 2022
अघोषित भारनियमन का?
नाशिक शहरातही अनेक ठिकाणी सध्या अघोषित भारनियमन सुरू आहे. त्यामुळे नाशिककर त्रस्त झालेत. अनेक भागात वीज येते कधी आणि जाते कधी याचा नेम नसतो. त्यामुळे सारे व्यवहार तुंबतात. शिवाय एकीकडे तापमान चाळीशीच्या वर जाताना घराबाहेर पडले की अंगाची लाहीलाही होते. मात्र, घरात बसले की बटाट्यासारखे उकडून निघावे लागते. महावितरणचे गाडे कधी रुळावर येणार आणि जनतेला दिलासा कधी मिळणार असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे. इतर बातम्याः
