नाशिकमध्ये पवार-ठाकरे गटाला मोठा धक्का, भाजप प्रवेशासाठी अनेकांचे देव पाण्यात, यासाठी हा आटापिटा
Thackeray Shivsena and Sharad Pawar NCP : नाशिकमध्ये सध्या आयाराम गयारामचे वारे आहे. काहींची घरवापसी सुरू आहे. तर काहींना पॉलिटिकल करिअर घडवायचे आहे. त्यामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे.

नाशिकमधील घडामोडी राज्यातील आगामी राजकीय परिस्थितीची झलक आहे. भाजपमध्ये सध्या इनकमिंग जोरात आहे. दुसरीकडे शिंदे सेना पश्चिम महाराष्ट्रात बडे नेते, पदाधिकारी गळाला लावत आहे. महाविकास आघाडीचे आऊट गोईंग काही केल्या थांबलेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नाशिक महापालिकेवर भाजपला कमळ फुलवायचे आहे. त्यासाठी सगळी गोळाबेरीज सुरू आहे. अनेक माजी नगरसेवक, नेते, पदाधिकार्यांसाठी भाजपने दार सताड उघडं ठेवलं आहे. जो येईल तो आपला, अशी हाक भाजपाने दिली आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात एकामागून एक हादरे बसत आहेत.
अनेकांच्या गुडघ्याला बाशिंग
आज मुंबईत माजी नगरसेवक सचिन मराठे, प्रशांत दिवे, सीमा ताजने, गणेश गिते सह अनेक माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. तर संजय राऊत यांच्या एक्स पोस्टनंतर सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या प्रवेशाला ब्रेक लागला. बागुल आणि राजवाडे यांच्यावर नाशकात गंभीर गुन्हा दाखल होता. भाजपावर टीका होऊ लागल्याने प्रवेशाला ब्रेक लागला. त्यांचा आज मुंबईत भाजपाच्या पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेश होणार होता. तर इतर ही अनेक नेते आणि पदाधिकारी गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक जशी जवळ येईल, तसे इनकमिंग वाढण्याची भीती महाविकास आघाडीतील घटक पक्षांना वाटत आहे.
अनेक माजी नगरसेवक वेटिंगवर
नाशिकमध्ये शरद पवार व ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये अनेक माजी नगरसेवक सामील होणार आहे. नाशिकमध्ये राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलताना दिसत आहेत. शरद पवार गटाचे माजी सभापती गणेश गिते, नाशिक महापालिकेतील नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे, माजी नगरसेवक कान्नू ताजमी, तसेच ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
पक्ष सोडण्यासाठी काय दिले कारण
महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर राज्यात अनेकांनी निमूटपणे भाजप, शिंदे सेना अथवा अजितदादा गटाची वाट धरली आहे. विरोधी गोटात सध्या बाहेर पडण्याची आणि सत्ता पक्षात जाण्याची कोण घाई दिसत आहे. अनेक पदाधिकारी, नेते, नगरसेवकांनी महायुतीचा मार्ग धरला आहे. विकास कामांसाठी आणि निधीच्या अडचणीमुळे हा पक्षप्रवेश होत असल्याचे या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. याआधी सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे यांनीही ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता आणखी अनेक पदाधिकारी व माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत.
