onion exports | कांद्याने केले व्यापाऱ्यांचे वांदे, कंटरनेरच्या भाड्यात अव्वाच्या सव्वा वाढ, परदेश निर्यातीत खोळंबा

onion exports | कांद्याने केले व्यापाऱ्यांचे वांदे, कंटरनेरच्या भाड्यात अव्वाच्या सव्वा वाढ, परदेश निर्यातीत खोळंबा
लासलगावमध्ये कांद्याची आवक वाढल्याने दर घसरले आहेत.

सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली पाहायला मिळतेय. त्यात लाल कांद्याचे सर्वसाधारण दर 750 रुपयांपर्यंत, तर उन्हाळी कांद्याचे सर्वसाधारण दर 1000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा झालेला खर्चही भरून निघणे मुश्किल झाले आहे.

उमेश पारीक

| Edited By: मनोज कुलकर्णी

Mar 29, 2022 | 3:42 PM

लासलगावः कांदा (Onion) कधी वांदा करेल, याचा नेम नसतो. मग तो उत्पादकाचा असो की खाणाऱ्यांचा. कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत दररोज कांद्याच्या बाजार भावात घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या बळीराजाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कांद्याला चांगला दर मिळण्याची गरजय. त्यासाठी व्यापाऱ्यांसह लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, आता कंटेनरच्या भाड्यात भरमसाठ वाढ झालीय. त्यामुळे परदेशात कांदा निर्यात (Export) करणाऱ्या व्यापाऱ्यांचे वांदे झालेत. देशांतर्गत गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगालच्या सुखसागर या ठिकाणी लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात येत आहे. राज्यातील लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार पेठेत तसेच नगर, पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या बाजार समित्यांमध्ये लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याची आवक सुरू झालीय. त्यामुळे कांद्याचे दर घसरतायत.

किती आहेत दर?

सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली पाहायला मिळतेय. त्यात लाल कांद्याचे सर्वसाधारण दर 750 रुपयांपर्यंत, तर उन्हाळी कांद्याचे सर्वसाधारण दर 1000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा झालेला खर्चही भरून निघणे मुश्किल झाले आहे. अशातच आता लाल कांद्याची आवक ही येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसात संपुष्टात येणाची शक्यता वर्तवली जात आहे, तर उन्हाळ कांद्याची मोठी आवक बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी दाखल होणार आहे. उन्हाळ कांद्याची टिकवण क्षमता ही पाच ते सहा महिने राहत असल्याने परदेशात उन्हाळ कांद्याला मोठी मागणी असते.

कुठे होते निर्यात?

परदेशात कांदा पाठवण्यासाठी कंटेनरच्या भाड्यात दुपटीने वाढ झाल्याने कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांचे चांगलेच वांदे झाले आहेत. लासलगाव येथून बांग्लादेश, मलेशिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, सिंगापूर, इंडोनेशिया, कतार, कुवेत, मॉरिशयस, सौदी अरेबिया, बेहरीन, ओमान, व्हिएतनाम, मालदीव, युनायटेड किंगडम, थायलंड, ब्रुनेई, रशिया, ग्रीस, हाँककाँग, पाकिस्तान, इटली, नेदरलँड्स, सेशल्स, कोमोरेझ, फ्रान्स, केनिया, कॅनडा, स्पेन, युनायटेड स्टेटस आदी देशांसह एकूण 76 देशांमध्ये कांदा निर्यात केला जातो.

सध्या किती भाडे?

दुबई येथे कांदा नेणाऱ्या कंटेनरला भाड्यापोटी 2 हजार डॉलर वरून मोजावे लागत होते. आता तेच दर 3 हजार डॉलरवर गेलेत. तर श्रीलंका, सिंगापूर, मलेशियासाठी कंटेनरला 1 हजार 900 डॉलर भाडे मोजावे लागत होते. आता हे भाडे अडीच हजार डॉलरहून अधिक द्यावे लागत आहे. त्यामुळे परदेशात कांदा कसा पाठवावा, असा मोठा प्रश्न कांदा निर्यातदार व्यापार्‍यांसमोर उभा राहिला आहे. केंद्र सरकारने याकडे लक्ष देत कांदा निर्यातीसाठी 10 टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी कांदा व्यापारी मनोज जैन यांच्यासह इतरांनी केली आहे.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें