नवी मुंबईतील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ; हेराफेरीचा मास्टरमाईंड शोधून काढा: शशिकांत शिंदे

शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा प्रमुख पक्षांनीच गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. | Navi Mumbai Election 2021

  • सुरेश दास, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई
  • Published On - 15:18 PM, 25 Feb 2021
नवी मुंबईतील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ; हेराफेरीचा मास्टरमाईंड शोधून काढा: शशिकांत शिंदे
Navi Mumbai Municipal Elections

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका निवडणूक (Navi Mumbai Election 2021) मतदार याद्यांवर साडेतीन हजार हरकती आल्या. त्यामुळे प्रारूप मतदार याद्यांवर हरकती घेण्याचा शेवटचा दिवस चांगलाच गाजला. तर अनेक मोठमोठे घोटाळे मतदार यादीत करण्यात आल्याचे समोर आले आहे. (Major mistakes and scam in Navi Mumbai voters list)

शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा प्रमुख पक्षांनीच गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण असा सवाल निर्माण झाला आहे. तर असे प्रकार करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांचा गॉडफादर शोधण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रभाग आरक्षण, प्रभाग रचना आणि मतदार याद्यांमध्ये भ्रष्टाचार करत असलेल्या पालिका अधिकाऱ्यांची लवकरच भांडाफोड होणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रभागातून विरोधकांच्या कुटुंबीयांचे नावच गायब

प्रभागातून विरोधकांचे कुटुंबच गायब करणे, पाचशे ते सहाशे बोगस मतदार नोंदवणे, वार्डातील हजार ते दोन हजार प्रमुख मतदार दुसरीकडे टाकणे आणि बाहेरचे सातशे ते आठशे मतदार सामील करणे अशा अनेक चुका या याद्यांमध्ये आढळल्याने पुन्हा सर्वेक्षणाची मागणी सर्व पक्षांकडून केली जात आहे. परंतू प्रारूप याद्यांना घेऊन जर सर्व पक्षीय आक्षेप असतील तर मग हे करतय कोण याचा शोध लावण्याची गरज आहे. तरच ‘दूध का दूध और पानी का पानी’ होईल, अशी मागणी राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

फेराफेरीसाठी 500 रुपये घेतले जातात: गणेश नाईक

आमदार गणेश नाईक यांनी एका नावामागे फेरफारीसाठी पाचशे रुपये घेतले जातात असा आरोप केला होता. तर नावांमध्ये फेरफारासाठी हजार ते पंधराशे रुपये घेतले जात असल्याचा नवा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

याबाबत राज्य सरकार, जिल्हाधिकारी, निवडणूक अयोग्य आणि पालिका आयुक्त निवेदन देणार आहोत. निवेदनानंतर देखील याद्यांमधील घोटाळ्याचा शोध नाही लागला तर कोर्टात जाणार असल्याचा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला. तर पालिका अधिकारी सर्वेक्षण न करता केवळ कार्यालयात बसून प्रारूप याद्या अंतिम करतात. कोणत्याच पक्षाला बोगस मतदारांच्या जीवावर निवडणूक लढवायची नसेल तर पुन्हा मतदारांच्या जागेवर जाऊन सर्वेक्षण करावे आणि योग्य मतदान याद्या तयार करूनच मतदान घेण्याची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

(Major mistakes and scam in Navi Mumbai voters list)