सरकारमध्ये राहून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन, महायुतीत नेमकं काय सुरु?
सरकारमध्ये असूनही शिवरायांच्या पुतळ्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. यावरुन राजकीय पोळी भाजू नका, असा निशाणा शिवसेना नेते रामदास कदमांनी साधलाय.

स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागितली आणि दुसऱ्याच दिवशी शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. मुंबईतल्या चेंबूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मूक आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर, तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात आलं. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वात, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा हार अर्पण करुन, काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आलं. नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन केलं. तर परभणीतही आत्मक्लेशन आंदोलन झालं.
सरकारमध्ये राहूनही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आंदोलनाची भूमिका घेतली. त्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही पुतळ्याच्या घटनेवरुन कोणीही राजकारण करु नये, अशी प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी तर राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करु नका, अशा शब्दात अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला. तर भाजपनंही अजित पवारांनाच भूमिका विचारली पाहिजे, असं म्हटलंय. म्हणजेच महायुतीत अजित दादांच्या राष्ट्रवादीच्या या भूमिकेवरुन नाराजी व्यक्त झालीय.
अजित पवारांनी पहिल्यांदा माफी मागितली
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी भूमिका पाहिली तर, पुतळा कोसळल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 तारखेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी ट्विट करत घाईघाईत पुतळा बनवल्याचं म्हणत अक्षम्य चूक म्हटलं. 28 तारखेला स्वत: अजित पवारांनीच 13 कोटी जनतेची माफी मागितली, सरकारकडून माफी मागणारे अजित पवार पहिले आहेत. अजित दादांनी माफी मागितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीनं सत्तेत असतानाही राज्यभर आंदोलनं केली. सरकारकडून अजित पवारांनी माफी मागितली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आपल्याला 100 वेळा माफी मागायला कमीपणा वाटणार नाही, असं म्हटलंय.
अमोल मिटकरी आणि नितेश राणे यांच्यात जुंपली
अमोल मिटकरींच्या आणखी एका ट्विटमुळे भाजप नेते नितेश राणे आणि अमोल मिटकरींमध्ये जुंपलीय. शिल्पकार जयदीप आपटेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर या शिल्पात खोप का दाखवली? काय या मागचा इतिहास? सर्व ठरवून केलंय का? की याच भरवशावर कंत्राट मिळवलं? जबाब तो देना पडेगा, अशा प्रकारचं ट्विट मिटकरींनी केलं. तर मिटकरींचाच धर्म तपासण्याची वेळ आलीय. मिटकरींची सुंता झालीय का?, अशी टीका नितेश राणेंनी केली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आंदोलनावरुन मुख्यमंत्र्यांनी राजकारण करु नका असं म्हटलं. तर दुसरीकडे महायुतीतल्या नितेश राणे आणि मिटकरींमध्येही जुंपली. म्हणजेच महायुतीत पुतळ्याच्या घटनेवरुन मतांतर दिसत आहेत.
