कुणाच्या लग्नाला गेलो ही माझी चूक काय? चूक असेल तर फासावर लटकवा; अजित पवार संतापले
वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केल्याने राज्यात खळबळ उडाली. वैष्णवी शशांकच्या लग्नाला अजित पवारही उपस्थित होते. त्यांच्या हस्तेच वधू-वरांना फॉर्च्युनर गाडीच्या चाव्या देण्यात आल्या होत्या. मात्र आता वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यातील वातावरण तापलं असून त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. हुंड्यासाठी छळ झाल्याने वैष्णवीने जीवन संपवल्याचं सांगितलं जात आहे. तर वैष्णवीची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे अजितदादांच्या गटाच्या नेत्याची वैष्णवी ही सून होती. तसेच अजितदादाही या लग्नाला हजर होते. या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. या प्रकरणात आपली उगाच बदनामी केली जात आहे. कुणाच्या लग्नाला जाणं ही माझी चूक आहे का? उगाच बदनामी करताय. माझी चूक असेल तर फासावर लटकवा, अशा शब्दात अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले अजित पवार ?
तु्म्ही घरचे लोक आहात मी सांगतो, तुम्ही अनेक जण मला लग्नाला बोलावता. शक्य असेल तेवढं यायचा मी प्रयत्न करतो, त्या भागात असेन तर उशिरा का होईना मी लग्नाला हजेरी लावतो. आता एखाद्या लग्नाला मी गेलो, आणि त्यांनी नंतर त्यांच्या सुनेला काही वेडवाकडं केलं, त्रास दिला तर तिथे माझा (अजित पवारचा) काय संबंध आहे ? असा थेट सवाल अजित दादांनी विचारला. अजित पवारनी त्यांना सांगितलं का असं कर म्हणून ? मला तर काही कळतच नाही. ही घटना घडल्या घडल्या मी पिंपरी-चिंचवडच्या सीपींना म्हटलं की, कोणी का असेना ॲक्शन घे.
ज्या मुलीने आत्महत्या केली तिची सासू, नणंद, नवरा आत जेलमध्ये आहेत. सासरा पाळलाय, पण ते पळून पळून कुठे जातील ? मी आजपण सांगितलं, 3 टीम शोधासाठी पाठवल्यात, तिथे 3 नाही 6 टीम्स पाठवा, मुसक्या बांधूनचं त्यांना आणा असा आदेश दिल्याचं अजित पवार म्हणाले. पण टीव्ही चनेलवाले मात्र अजित पवारांना जाब विचारला पाहिजे असं खुशा म्हणत आहे, माझा या प्रकरणाशी काय संबंध आहे ? या सवालाचा त्यांनी पुनरुच्चार केला.
आम्ही राजकीय क्षेत्रातील लोकं, उद्या अजून कोणाच्या घरात लग्न निघालं तर प्रेमापोटी ते बोलावतात, जावं लागतं ना,नाही गेलं तरी ते माणूस रुसतंय, त्यामुळे शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना. पण सुनेशी असं वागा, त्रास द्या असं आम्ही त्यांना सांगतो का ? असा परखड, थेट सवाल अजित दादांनी विचारला. मीच लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये द्यायला सुरूवात केली, याआधी कोणीच याची सुरूवात केली नव्हती. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी. आम्ही मिळून या योजनेची सुरूवात केली. आणि तिछेे ते चॅनेलवाले खुशाल म्हणतात ( याप्रकरणी)अजित पवारांना जाब विचारला पाहिजे. जर अजित पवार तिथे दोषी असतील, कुठे तिथे संबंध असेल तर फासावर लटकवा अशा शब्दांत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. पण उगीच माझी बदनामी कशाला, काही घेणं न देणं, असंही ते म्हणाले.
तिथे लग्नात ते (मुलीचे वडील) मला म्हणाले ही चावी (गाडीची) मला जावयला द्यायची आहे, मी म्हटलं द्या हो…तरीही ती चावी देताना मी विचारलं ही (गाडी) स्वखुशीने देताय की बळजबरीने देताय ? असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.