नीटचं आंदोलन मंत्रालयाच्या दारात… पवार गटाच्या अचानक एन्ट्रीने तारांबळ, धरपकड; आझाद मैदानात क्लासवाले जमले
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याविरोधात आज शरद पवार गटाने मंत्रालयासमोर अचानक आंदोलन केले, तर आझाद मैदानात कोचिंग क्लास मालकांनी एकत्र येत 'इंटिग्रेटेड क्लासेस' बंद करण्याची मागणी केली.

नीट पेपरफुटी प्रकरणाने देशात खळबळ उडाली आहे. या प्रकणातील सर्वाधिक आरोपी महाराष्ट्रातील असल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. पेपरफुटीमुळे असंख्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थीही टेन्शनमध्ये आले आहेत. तर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार गटाने अचानक आंदोलन केलं. मंत्रालयासमोरच पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. तर दुसरीकडे आझाद मैदानात क्लासवाल्यांनी जमून जोरदार निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे.
शरद पवार गटाच्या नेत्या सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांनी आज अचानक मंत्रालयाला धडक दिली. यावेळी या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली. पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक अधिकच आक्रमक झाले. काही आंदोलकांनी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यामुळे पोलिसांनी या सर्व आंदोलकांची धरपकड करत त्यांना व्हॅनमध्ये बसवलं.
आझाद मैदानात क्लासवाले
दुसरीकडे, नीट पेपरफुटी नंतर कोचिंग क्लासेसच्या व्यवसायाची होत असलेल्या बदनामी विरोधात महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनचे आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर मोटेगावकर क्लासेसमुळे कोचिंग क्लासेस व्यवसायाची बदनामी होत असल्याच्या विरोधात राज्यातील कोचिंग क्लासेस संघटना एकवटल्या आहेत. एक-दोन कोचिंग क्लासेस मुळे संपूर्ण कोचिंग क्लासेस व्यवसायाची बदनामी होत असल्याचं महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनच म्हणणं आहे.
इंटिग्रेटेड नकोच
इंटिग्रेटेड क्लासेसमुळे पेपरफुटी प्रकरणासमोर येत असल्याचा दावा या कोचिंग क्लासेस शिक्षकांनी केला आहे. कॉर्पोरेट क्लासेस आणि कॉलेज त्यासोबतच शाळांना संलग्न असलेल्या इंटिग्रेटेड कॉलेजचा कोचिंग क्लासेस संघटना विरोध करणारा असून हे इंटिग्रेटेड कॉलेज बंद करण्याची सरकारकडे मागणी केली आहे. जे शिक्षक एखाद्या कॉलेज आणि शाळांमध्ये शिकवतात, त्यांना कोचिंग क्लासेस मध्ये शिकवण्यास परवानगी मिळू नये, असे या कोचिंग क्लासेस संघटनांचे म्हणणं आहे.
अशा इंटिग्रेटेड आणि कॉर्पोरेट क्लासेसमुळे पेपर फुटीचा प्रकार वाढत असल्याचं कोचिंग क्लासेस मालकांचे म्हणणं असून त्यावर सरकारने कडक नियमांची अंमलबजावणी करावी, असं मत कोचिंग क्लासेस संघटनांनी मांडलं आहे, सकाळी 10 वाजल्यापासून आझाद मैदानावर विविध राज्यातील कोचिंग क्लासेस चे प्रतिनिधी एकत्र येऊन आपल्या व्यवसायाची होणाऱ्या बदनामी विरोधात आवाज उठवत असून राजकीय नेत्यांना निवेदन देखील देणार आहेत.
