NEET Paper Leak : NEET प्रकरणात कुणालाही सोडणार नाही; काँग्रेसचीही चौकशी करा – भाजपची मागणी
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली असून, सीबीआय चौकशीत रोज नवनवे खुलासे होत आहेत. लातूरमधील आरसीसी कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक शिवराज मोटेगावकर याला अटक करण्यात आली. यानंतर भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत पेपरफुटी प्रकरणाशी काँग्रेसचा थेट संबंध असल्याचा दावा केला. संजय राऊत यांनी भाजपाऐवजी काँग्रेसलाच प्रश्न विचारण्याचा सल्लाही बन यांनी दिला.

नीट (NEET) वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने देशभरात मोठी खळबळ माजली. याप्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरू असून रोजच नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी सीबीआयने काल लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक शिवराज मोटेगावकर याला अटक केली. त्यानंतर दिल्लीच्या विशेष न्यायालयाने त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी देखील सुनावली. नीट पेपर फुटी प्रकरणात बरेच धक्कादायक खुलासे झाले असून अनेकांची नावंही समोर आली आहेत. याच केसवरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण देखील सुरू आहे.
विरोधकांनी या मुद्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडलेलं असतानाच आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी यावरून चोख प्रत्युत्तर दिलंय. नवनाथ बन यांनी NEET पेपरफुटी प्रकरणात काँग्रेसशी संबंधित लोकांची नावं पुढे येत असल्याचा दावा केला. “ कुणी कुणाच्याही जवळचं असलं तरी त्याला सोडलं जाणार नाही. काही ठिकाणी काँग्रेसचे आणि पेपरफुटीचे थेट संबंध समोर येत आहेत,” असं नवनाथ बन म्हणाले. त्यांच्या आरोपामुळे मोठी खळबळ माजली आहे.
NEET प्रकरणात कुणालाही सोडणार नाही; काँग्रेसचीही चौकशी व्हावी
भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी NEET पेपरफुटी प्रकरणावरून जोरदार टीका केली. “ नीट पेपर लीक प्रकरणात दोषी कोणीही असो, त्याच्यावर CBI आणि केंद्र सरकारमार्फत कठोर कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही,” असं बन यांनी स्पष्ट केलं.
पुढे त्यांनी लातूरमधील आरसीसी’ (RCC) कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक मोटेगावकर याच्या अटकेचा उल्लेख केला. “मोटेगावकरांनी सार्वजनिक मंचावर स्वतःला अमित देशमुख यांचा माणूस असल्याचं सांगितलं होतं. काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय असलेला तोच व्यक्ती या प्रकरणातील सूत्रधार ठरत आहे. मग संजय राऊत अमित देशमुखांना प्रश्न का विचारत नाहीत?” असा थेट सवाल बन यांनी उपस्थित केला. काँग्रेस आणि पेपरफुटीमधील संबंधांची चौकशी व्हावी, अशी मागणीही बन यांनी केली.
राऊतांनी भाजपाला नाही, आधी काँग्रेसला सवाल करावा
नीट पेपरफुटी प्रकरणात काँग्रेसशी संबंधित लोकांची नावं पुढे येत असल्याचा दावा नवनाथ बन यांनी केला. “ कोणी कोणाच्याही जवळचं असलं तरी त्याला सोडलं जाणार नाही. काही ठिकाणी काँग्रेसचे आणि पेपरफुटीचे थेट संबंध समोर येत आहेत,” असं बन म्हणाले. संजय राऊत यांनी भाजपावर आरोप करण्यापूर्वी काँग्रेसला प्रश्न विचारावेत, असा सल्लाही बन यांनी दिला.
तरुणाई भाजपासोबत; विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही
पुढे नवनथा बन यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. “कोणी कोणाची ‘नीट’ मारली हे विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे” असं ते म्हणाले. “जनतेने तुमच्या पक्षाची नीट मारली आहे,” असं म्हणत त्यांनी उबाठा गटाला टोला लगावला. विद्यार्थ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं सांगत बन म्हणाले, “NEET परीक्षा रद्द करून फेरपरीक्षेचा निर्णय घेतला आहे. कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही.”
