नाशिक कुंभमेळ्यात साईबाबांच्या नावाने सुरू होणार नवीन आखाडा ; महंत महादेवदास महाराज यांची घोषणा
शिर्डीचे साईबाबा यांच्यावर संत युवराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे. याबद्दलही उत्तराखंड येथील जोगेश्वरधामचे महंत महादेव दास महाराज यांनी समाचार घेत दुसऱ्याची निंदा करणारे स्वत:ला संत कसे म्हणवून घेत आहेत असा सवाल केला आहे.

साल 2027 मध्ये नाशिक येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यात साईबाबांच्या नावाने नवीन आखाडा सुरु करणार असल्याची घोषणा उत्तराखंड येथील जोगेश्वर धामचे महंत महादेव दास महाराज यांनी केली आहे.मंहत महादेवदास महाराज यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी साईबाबांच्या नावाने सुरू करण्यात येणाऱ्या आखाड्याचे कार्य अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले आहे.
महंत महादेव दास महाराज हे भगवान शंकराचे निस्सिम भक्त असून त्यांनी अनेक वर्ष हिमालयातील विविध गुफांमध्ये तपसाधना केलेली आहे.उत्तराखंड येथील जोगेश्वरधाम येथे त्यांची आध्यात्मिक साधना आजही सुरू आहे.महंत महादेव दास महाराज यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि साईबाबांची पुजाविधी तसेच दैनंदिन कार्यक्रमांचे कौतुक केलं. 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात साईबाबांच्या नावाने नवीन आखाडा सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
या आखाड्याच्या माध्यमातून सनातन धर्माचे विचार लोकांपर्यंत पोहचण्याचे कार्य ते करणार आहेत. सनातन हिंदू धर्माला अपेक्षित गोरगरिबांची सेवा करण्याचे काम साईबाबांनी केले. कुंभमेळ्यातील हा आखाडा देशातील कोट्यवधी साईभक्तांचा आखाडा असेल आणि सर्व साईभक्तांनी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी यावे असे आवाहन महंत महादेवदास महाराज यांनी केले आहे.
ते खरंच संत आहेत की नाहीत?
साईबाबांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संत युवराज यांच्यावर देखील महंत महादेवदास महाराज यांनी निशाणा साधला आहे. जे लोक साईबाबांविषयी अवमानजनक वक्तव्य करतात त्यांनी शिर्डीला यावे आणि बाबांची पूजा आणि आरती सनातन हिंदू रितीरिवाजाप्रमाणे होते हे त्यांनी बघावे. युवराज हे कोणत्या आखाड्याचे महंत आहेत? आणि त्यांना कुणी महंत बनवले? आम्ही अशा तथाकथित आखाड्यांना मानत नाही.आम्ही सनातन धर्माच्या मूल्य सिद्धांतावर चालणाऱ्या आखाड्यांनाच मानतो. कुणी स्वतःला संत म्हणत असतील तर ते दुसऱ्यांची निंदा कशी करू शकतो ?.सनातन धर्मात निंदा करणे पाप आहे. युवराज संत असून निंदा करत असतील तर हिंदू समाजाने विचार करावा की ते खरंच संत आहेत की नाहीत? अशा शब्दात महंत महादेवदास महाराज यांनी साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संत युवराज यांना खडे बोल सुनावले आहेत.
