नितीन गडकरी चांगला माणूस पण चुकीच्या पक्षात; काँग्रेसच्या नेत्याकडून प्रशंसा

गडकरी रस्ते व वाहतूक मंत्री म्हणून उत्तम काम करत आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून त्यांची कोंडी केली जाते. | Nitin Gadkari Ashok Chavan

नितीन गडकरी चांगला माणूस पण चुकीच्या पक्षात; काँग्रेसच्या नेत्याकडून प्रशंसा
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

नांदेड: कोरोना काळातील कामगिरीमुळे गेल्या काही दिवसांमध्ये कौतुकाचा वर्षाव होत असलेले देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची आता काँग्रेसकडूनही प्रशंसा करण्यात आली आहे. केंद्रातील भाजप सरकारची एकूणच कामगिरी उणेच असली तरी केंद्रीय मंत्रिमंडळातील रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणजे ‘ चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस’ असे त्यांचे वर्णन करावे लागेल, असे मत काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले. (Congress leader Ashok Chavan praises BJP minister Nitin Gadkari)

ते रविवारी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. नितीन गडकरी रस्ते व वाहतूक मंत्री म्हणून उत्तम काम करत आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून त्यांची कोंडी केली जाते. त्यांच्याकडून अनेक अधिकार काढून घेण्यात आले आहेत, असा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला.

यापूर्वी भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही मोदी सरकारने कोरोना लढ्याची सूत्रे नितीन गडकरी यांच्यात हातात सोपवावीत, असे म्हटले होते. पंतप्रधान कार्यालय हे कुचकामी आहे. नितीन गडकरी देशातील कोरोनाची परिस्थिती योग्यप्रकारे हाताळलीत, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी सुचविले होते.

‘गडकरीसाहेब म्हणाले, विदर्भातील ऑक्सिजनचं आम्ही बघतो, बाकीचं तुम्ही बघा’

कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने महाराष्ट्रात ऑक्सिजन तुटवडा जाणवत असताना नितीन गडकरी यांनी नागपुरात ठाण मांडून सूत्रे हाताळली होती. त्यांनी विदर्भासासाठी ऑक्सिजन आणण्याची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, विदर्भातलं ऑक्सिजन पुरवठ्याचं आम्ही बघतो, बाकीचं तुम्ही बघा, असं वेगवेगळ्या भागातलं नियोजन वाढलं तर कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा करायला अडचण येणार नाही.

‘मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री’

मोदी सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांमध्ये नितीन गडकरी यांचा वरचा क्रमांक लागतो. नितीन गडकरी यांचा प्रशासनावर असणारा वचक आणि झपाट्याने काम उरकण्याची क्षमता या दोन्ही त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. याशिवाय, उपजत असलेल्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांना अनेक विषयांचे ज्ञान आहे. इंधननिर्मितीसाठी इथेनॉलचा प्रभावीपणे वापर असो किंवा महामार्ग प्रकल्पांचे वेगाने काम करण्याची हातोटी नितीन गडकरी यांच्याकडे आहे.

संबंधित बातम्या:

नितीन गडकरींचा थेट फार्मा कंपनीच्या मालकाला फोन, नागपुरात एका झटक्यात 10 हजार इंजेक्शन

कोरोनाविरुद्धच्या लढाईची जबाबदारी गडकरींकडे देण्याची पुन्हा पुन्हा मागणी का? वाचा सविस्तर

नितीन गडकरी रेमडेसिव्हीरसाठी मैदानात, सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीशी चर्चा, एका फोनवर 4 हजार इंजेक्शनची सोय

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI