चिखलात रुतलेल्या एसटीचा फोटो पाहून गडकरींनी कंत्राटदारांना झापलं

अजिंठा लेणीला जाणाऱ्या औरंगाबाद-जळगाव महामार्गाचा फोटो पाहून नितीन गडकरींनी अधिकारी आणि कंत्राटदारांना फैलावर घेतलं.

चिखलात रुतलेल्या एसटीचा फोटो पाहून गडकरींनी कंत्राटदारांना झापलं

मुंबई : सर्वसामान्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेणारे नेते म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ओळखलं जातं. राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सचिव आशिष मेटे यांनी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला जाणाऱ्या औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या दुर्दशेचा फोटो ट्वीट केला होता. याची तात्काळ दखल घेत नितीन गडकरींनी अधिकारी आणि कंत्राटदारांना फैलावर (Nitin Gadkari Slams Contractors) घेतलं.

औरंगाबाद-जळगाव महामार्गावर पावसामुळे चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. या रस्त्यावर एसटी बस चिखलात रुतून बसल्याचा फोटो सोशल मीडियावर काही दिवसांपासून व्हायरल झाला होता. आशिष मेटे यांनी हाच फोटो ट्वीट करत गडकरींना टॅग केलं.

‘जागतिक वारसा असलेल्या अजिंठा लेणीला जाणारा हा आहे औरंगाबाद-जळगाव हायवे. गेल्या चार वर्षांपासून अशा रस्त्यांवरुन जनता जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे. आदरणीय @nitin_gadkari साहेब आपण यात लक्ष घालावे. कारण दिवसेंदिवस अपघाताचे लोण या रस्त्यावर वाढत आहे.’ असं ट्वीट मेटे यांनी केलं.

‘औरंगाबाद-सिल्लोड-जळगाव मार्गाची दुर्दशा दाखवणारा फोटो माझ्या निदर्शनास आला. सार्वजनिक बांधकाम खात्यातील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित मुख्य अभियंत्यांना यासंबंधी सूचना दिलेली आहे. पुढील आठ दिवसांत रस्त्याची स्थिती सुधारण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा, परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा. हे स्वीकारार्ह नाही. अधिकारी किंवा कंत्राटदार, हलगर्जीबद्दल कोणालाही माफ केलं जाणार नाही’ असा इशाराच नितीन गडकरींनी दिला.

गडकरींच्या उत्तरानंतर (Nitin Gadkari Slams Contractors) आशिष मेटेंनीही आभार व्यक्त केले आहेत. ‘साहेब आपण आमच्या तक्रारीची दखल घेऊन तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन 8 दिवसात कारवाई करायला सांगितली. आता बघुया 8 दिवसात हे काय करतात अन्यथा राष्ट्रवादी युवकच्या वतीने अधिकाऱ्यांचा आम्हाला सत्कार करावा लागणारच.’ असं आशिष मेटेंनी म्हटलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *