महाराष्ट्रात छावा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ होणार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis on Chhaava Tax Free: महाराष्ट्रात करमणूक करच नाही. इतर राज्य जेव्हा एखादा चित्रपट करमुक्त (टॅक्स फ्री) करतात तेव्हा ते करमणूक कर माफ करतात. परंतु महाराष्ट्राने 2017 सालीच करमणूक कर नेहमीसाठी रद्द केला.

Devendra Fadnavis on Chhaava Tax Free: देशभरात सध्या विकी कौशल यांची भूमिका असलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील छावा चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील कथानक आणि मांडलेला इतिहास त्यामुळे संभाजी महाराजांचे चरित्र सर्वांसमोर आले आहे. देशभरात उत्पन्नाचे नवनवीन विक्रम हा चित्रपट करत आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ (करमुक्त) करण्याची मागणी विविध संघटना आणि पक्षांकडून होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात यासंदर्भात वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, वीरता आणि विद्धवता प्रचंड होती. परंतु इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला. आता त्यांच्यावर अतिशय चांगला चित्रपट आला आहे. ऐतिहासिक असा हा चित्रपट तयार झाला आहे. हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी होत आहे. परंतु महाराष्ट्रात करमणूक करच नाही. इतर राज्य जेव्हा एखादा चित्रपट करमुक्त (टॅक्स फ्री) करतात तेव्हा ते करमणूक कर माफ करतात. परंतु महाराष्ट्राने 2017 सालीच करमणूक कर नेहमीसाठी रद्द केला. त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही. आता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी आम्हाला अधिक काय करता येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करु.




त्यांना त्यांची जागा दाखवू
संभाजी महाराज यांच्याबद्दल विकीपीडीयावर वादग्रस्त लिखाण आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, विकीपीडीयाला नोटीस बजवण्याचे निर्देश दिले गेले आहे. तसेच संभाजी महाराजांना अपमानित करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू, असे कोणी वागत असेल तर त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवू आणि शिवप्रेमी त्यांना जागा दाखवतील. संभाजी महाराज यांच्यासंदर्भात निर्माण होणारा वाद राजकीय किनार असणारा आहे. तथापि यासंदर्भात अनेक समित्या केल्या गेल्या आहेत. त्याच्यावर सरकारने निर्णयसुद्धा घेतले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले. परंतु दोन्ही मुख्यमंत्री त्यांच्यासोबत नाही. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अजित पवार आणि एकनाथ शिंदे माझ्यासोबत पुण्यात आले. परंतु त्यांचे वेगळे कार्यक्रम असल्यामुळे ते निघून गेले.