वडेट्टीवारांचा जरांगेंसमोरच ओबीसीतून मराठा आरक्षणाला पाठिंबा.., भुजबळांच्या लावरे तो व्हिडीओने खळबळ
आज बीडमध्ये ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडली, या सभेमध्ये बोलताना भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर मोठा आरोप केला आहे, वडेट्टीवार यांचा मराठा समाजाच्या ओबीसीमधून आरक्षणाला पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हैदराबाद गॅझेटविरोधात आता ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत, आज बीडमध्ये ओबीसी नेत्यांनी महाएल्गार सभेचं आयोजन केलं होतं, मात्र या सभेला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे उपस्थित नव्हते, यावरून छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, विजय वडेट्टीवार यांचाच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी पाठिंबा असल्याचा आरोप भुजबळांनी यावेळी केला आहे, त्यांनी यावेळी एक व्हिडीओ देखील दाखवला.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
विजय वडेट्टीवार दोन तीन रॅलीला आलेच नाहीत. बीडला झाली, पंढरपूरला झाली, कोणता दबाव तुमच्यावर होता? ओबीसींसोबत राहणार म्हणाले होते ना, मग का नाही राहिलात? असा सवाल यावेळी भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांना केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मला संपादकांनी फोन केला. नागपूरच्या रॅलीला का नाही आले? यावेळी भुजबळ यांनी एक व्हिडीओ दाखवत असा आरोप केला की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या असं वडेट्टीवार म्हणाले आहेत, हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. वडेट्टीवार एकच मुद्दा घेऊन उभे राहा, आम्ही सोबत आहोत. पण जरांगेंकडे सांगणार मराठ्यांना आरक्षण द्या, अंबडच्या मिटिंगला येणार, नंतर पाठ फिरवणार. कसं शक्य आहे हे? मी संपादकांना सांगितलं बघा हे व्हिडिओ. तासा तासाला तुम्ही बदलायला लागला तर ओबीसींचा घात होईल. आम्ही कुणीही पक्षासाठी काम करत नाही. आम्ही ओबीसींसाठी काम करत आहोत. आम्ही पक्षाच्या दावणीला बांधलो नाहीत. पक्षाच्यावेळी पक्षासाठी काम करू. पण ओबीसींचा प्रश्न आल्यावर ओबीसींसाठीच काम करू. तुम्हीच मराठ्यांना आरक्षण द्या म्हणता, अन् म्हणतात फडणवीस यांना काढा . तुम्ही विखेंचं नाव घेत नाही. त्यांनीच आरक्षण दिलं. तुमचं यातून राजकारण दिसत आहे. तुम्ही वारंवार बदलत असाल तर चालणार नाही. तुम्हाला हातजोडून विनंती आहे, असा हल्लाबोल यावेळी भुजबळ यांनी वडेट्टीवार यांच्यावर केला आहे.
दरम्यान पुन्हा एकदा सांगतो, ज्यांनी ज्यांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली त्यांना बरोबर डोक्यात ठेवा आणि त्यांचा बरोबर हिशोब करा, आज हा सर्व माधव एकत्र आला आहे, असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं.
