नवी मुंबईत स्टार जातीच्या 293 कासवांची तस्करी रोखण्यात यश

  • Sachin Patil
  • Published On - 13:27 PM, 13 Nov 2018
नवी मुंबईत स्टार जातीच्या 293 कासवांची तस्करी रोखण्यात यश

ब्रिजभान जैसवार, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई : कर्नाटकहून नवी मुंबईत तस्करीसाठी आणलेल्या स्टार प्रजातीच्या 293 जिवंत कासवांना जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे . हे सर्व कासव कर्नाटकवरून आणले होते. यामागे काही सराईत वन्यजीव तस्कर आणि व्यापाऱ्यांचा हात असल्याची माहिती आहे.

नवी मुंबईतील वाशी प्लाझाजवळ वाशी फ्लाय ओव्हर खाली शनिवारी महसूल गुप्त संचालनालय मुंबई झोन, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो नवी मुंबई आणि वन्य परिक्षेत्र अधिकारी वन्यजीव या तीनही विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून दोन आरोपींना अटक केली.

यामध्ये एक फरार आहे. आरोपींकडून जप्त केलेल्या कासवांच्या खरेदी-विक्रीवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत बंदी आहे. अटक करण्यात आलेले आरोपी कोंडीबा लिंगा राजू आणि श्रीकांत लिंगा राजू हे दोघे वन्यजीव तस्करी करणारे सराईत आरोपी आहेत. तर तानाजी कलंगे नावाचा आरोपी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. अटक आरोपींवर वन्यजीव सरंक्षण अधिनियम 1972 मधील कलम 9, 39, 48(A) आणि 51 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

महसूल गुप्त संचालनालय मुंबई झोन, वन्य जीव अपराध नियंत्रण ब्युरो नवी मुंबई, वन परिक्षेत्र अधिकारी वन्य जीव ठाणे यांची ही संयुक्त कारवाई होती. स्टार कासवचा वापर घरात ठेवण्यासाठी केला जातो. पुढील तपास सध्या सुरु आहे.