आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये पुन्हा जोरदार राडा, आता नवं प्रकरण समोर
आमदार निवासस्थानाच्या कॅन्टीनमधील वादंग काही केल्या थांबायला तयार नाही. निकृष्ट जेवणावरून आमदार संजय गायकवाड यांच्या राड्यानंतर आता आणखी एक नवं प्रकरण समोर आलं आहे.

मंगळवारी रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये जोरदार राडा झाला. निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याचा आरोप करत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये जोरदार राडा केला. निकृष्ट जेवणं दिल्याचा आरोप करत त्यांनी कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केली. शिळा भात आणि वास येणारी डाळ दिल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.
या वादावर आपली भूमिका मांडताना संजय गायकवाड यांनी म्हटलं की, मी गेल्या साडेपाच वर्षांपासून मुंबईमध्ये येत आहे. मी शक्यतो बाहेर जेवायला जात नाही. मी रात्री जेवणासाठी डाळ, वरण, भात आणि चपातीची ऑर्डर दिली. मात्र पहिला घास खाताच मला खूप अस्वस्थ झालं. वरणाला खूप भयंकर वास येत होता. पॉयजन सारखा हा प्रकार होता. भात शिळा होता. यापूर्वी देखील तीनवेळा असाच प्रकार घडला होता, त्यानंतर मी मालकाला समज देखील दिली होती असा दावा संजय गायकवाड यांनी केला आहे. मी विचारलं इथे कुक मॅनेजर कोण आहे? त्याने देखील वास घेतला, खूप घाण वास येत होता, मग त्यांना मी आपल्या स्टाइलमध्ये चांगला प्रसाद दिला असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान हा वाद शांत होतो न होतो तोच आता पुन्हा एकदा आमदार निवासमधील कॅन्टीमध्ये राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या राड्यानंतर आणि एफडीएच्या तपासणीनंतर आता कॅन्टीनमध्ये काम करणारे वेटरच आपसात भिडल्याचं पाहायला मिळालं. किरकोळ वादातून या दोन्ही वेटरने एकमेकांना मारहाण सुरू केली, या वादात काही नागरिकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. कॅन्टीनमधील अंतर्गत वातावरण किती बिघडले आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.
एफडीएकडून तपासणी
दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपानंतर आणि झालेल्या जोरदार राड्यानंतर आता एफडीएकडून आमदार निवासातील कॅन्टीनची तपासणी करण्यात आली आहे. कालच्या प्रकरणामुळे हे कॅन्टीन सध्या चांगलंच चर्चेमध्ये आलं आहे.
