Aanchal Goyal | परभणीच्या जिल्हाधिकारीपदी रुजू, आंचल गोयल यांचा पहिल्याच दिवशी कामाचा धडाका

परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी आयएएस अधिकारी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली. परभणी येथे रुजू होण्यासाठी आंचल गोयल 27 जुलै रोजी आपल्या बाळासह परभणीत आल्या होत्या.

Aanchal Goyal | परभणीच्या जिल्हाधिकारीपदी रुजू, आंचल गोयल यांचा पहिल्याच दिवशी कामाचा धडाका
Aanchal Goyal

प्रशांत चालिंद्रवार, टीव्ही 9 मराठी, परभणी : परभणीच्या जिल्हाधिकारीपदी रुजू झाल्यानंतर आयएएस अधिकारी आंचल गोयल (Aanchal Goyal) यांनी पहिल्याच दिवशी कामाचा धडाका सुरु केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्याच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात आंचल गोयल यांनी पाहणी केली. परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून कालच त्यांनी पत्राद्वारे पदभार स्वीकारला होता. रुजू होण्याच आधीच बदली अचानक रद्द झाल्यानंतर परभणीतील नागरिकांनी त्यांच्या समर्थनात आंदोलन छेडल्यामुळे आंचल गोयल चर्चेत आल्या होत्या.

गोयल यांची बदली अचानक झालेली रद्द

परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी आयएएस अधिकारी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली. 13 जुलै रोजी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले होते. विशेष म्हणजे परभणी येथे रुजू होण्यासाठी आंचल गोयल 27 जुलै रोजी आपल्या बाळासह परभणीत आल्या होत्या. त्यामुळे मुगळीकर यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी गोयल पदभार घेणे अपेक्षित होते. मात्र नियुक्तीच्या दिवशीच गोयल यांना मुंबईत परत बोलवण्यात आल्याने त्या पदभार न स्वीकारता परतल्या.

या सर्व प्रकारानंतर परभणीकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. समाज माध्यमांतूनही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. आंचल गोयल परभणीत रुजू होऊ नयेत, यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत त्यांना पदभार घेण्यापासून दूर ठेवल्याचे म्हटले जाते.

जागरूक नागरिक आघाडीच्या माध्यमातून संताप

एका महिला अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिली गेली. त्यामुळे परभणीकरांनी या निर्णयाविरूद्ध जागरूक नागरिक आघाडीच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने केली होती. यानंतर हा प्रश्न राज्यभर गाजला. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा पालकमंत्री नवाब मलिक यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल याच राहतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.

जनतेचा विजय झाल्याची भावना परभणीकरांतून व्यक्त होत आहे. मंगळवारी सायंकाळी नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून परभणी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्याचे कळवले. त्यानंतर आज परभणीत जागरूक नागरिक आघाडी संघर्ष समितीच्या वतीने एकमेकांना पेढे देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

संबंधित बातम्या :

जिल्हाधिकारीपदी रुजू होण्यासाठी बाळासह परभणीत, आंचल गोयल यांनी अखेर पत्राद्वारे पदभार स्वीकारला

आम्हाला डॅशिंग अधिकारी आंचल गोयल याच जिल्हाधिकारी हव्यात, परभणीकरांचं आंदोलन, सरकार दखल घेणार?

डॅशिंग अधिकारी आंचल गोयलच परभणीच्या जिल्हाधिकारीपदी, नवाब मलिक यांचं स्पष्टीकरण

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI