त्याला गोळ्या घालूनच मारलं पाहिजे, दिसेल तिथे ठेचा आणि गाडा; उदयनराजे भोसले राहुल सोलापूरकरवर संतापले
Udayanraje Bhosle on Rahul Solapurkar : अभिनेते राहुल सोलापूरकर यांना आग्र्यातीत जावाईशोध महागात पडण्याची शक्यता आहे. छत्रपतींचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून सुटका करताना औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिल्याचा जावाईशोध लावला. त्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यात संतापाची लाट उसळली. छत्रपतींचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. राहुल सोलापूरकर यांना गोळ्या घालूनच मारलं पाहिजे असे टोकाचं विधान त्यांनी केलं. तर सोलापूरकर जिथे दिसेल तिथे ठेचा आणि त्याला गाडा असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
यांना वेचून ठेचलं पाहिजे
केवळ मलाच नाही शिवभक्तांना वेदना होतात. काय असं विधान केलं. हा राहुल सोलापूरकर कोण आहे. तो जो म्हणाला लाच. जे लाच घेतात यांना लाचपलिकडे काही समजत नाही. असं बोलतांना जिभेला हाड नसतं माहीत आहे. लावली जीभ टाळूला काहीही बोलायचं. अशा लोकांच्या जीभा हासडल्या गेल्या पाहिजे. महापुरुषांबद्दल अशी विधानं करतात अशा लोकांना दिसेल तिथे ठेचलं पाहिजे. वेचून ठेचलं पाहिजे, असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला. ही विकृतीची वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. वेगवेगळ्या जातीधर्मात अशा विकृतांमुळे तेढ निर्माण होते, असे ते म्हणाले.




अमित शाह यांच्याकडे करणार तक्रार
फडणवीस यांना भेटणार आहे. अमित शाह यांनाही भेटणार आहे. अशी विधाने करणार्यांवर कडक कारवाई करावी. देशद्रोहाचा कायदा त्यांच्यावर लागू केला पाहिजे, अशी मागणी उदयनराजे यांनी केली. शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाही तर देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही. विकृत विधाने करणार्यांना थांबवलं पाहिजे. त्यांचे सिनेमे बंद केले पाहिजे. निर्माते, दिग्दर्शकांनीही अशा लोकांनाही थारा देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
अशा लोकांना गाडलं पाहिजे
या लोकांना गाडलं पाहिजे. त्यांना गाडलं नाही तर देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे. कठोर शब्दात मी निषेध करतो. मला विचारलं तर त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. त्यालाच नाही तर असे जे जे लोकं असतील त्या सर्वांना गोळ्या घातल्या पाहिजे. कुणीही बेताल विधानं करायचं. जीवाची पर्वा न करता शिवाजी महाराज पुढे गेले. अशा महापुरुषांबद्दल अशी विधाने होत असतील तर दुसरा काही पर्याय नाही. तो जिथे दिसेल त्याचा ठेचा आणि गाडा, असा संताप राजेंनी व्यक्त केला.
सोलापूरकरांना तुरुंगात टाका
आपला जो इतिहास आहे. वेळीच आळा घातला नाही तर इतिहासाला वेगळं वळण देतील. कालांतराने शिवाजी महाराजांना वेगळं दाखवतील. आज आपण शिवाजी महाराजांची प्रतिमा देव्हाऱ्यात ठेवतो. का तर, बाकीच्यांनी साम्राज्य वाढवण्यासाठी लढाया केल्या. पण शिवाजी महाराज गोरगरीबांसाठी लढले. स्त्रीयांचं संरक्षण केलं. परकीय आक्रमण थोपवलं.
त्यांच्यावर कारवाई करा. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. तुरुंगात टाका. एक दोन दिवसात अमित शाह यांची भेट घेणार. आधीही त्यांना भेटलो होतो. खासदार असो की मंत्री असो शोधून गाडलं पाहिजे. ठेचलं पाहिजे. ही चूक नाही तर घोडचूक आहे. औरंगजेबच्या भेटीला जाताना लाच दिली म्हणून भेटीला गेले. तसे नव्हते. त्यांच्या शौर्याचं प्रतिक होतं. लाच कशाला देतील. राहुल्याची लायकी काय आहे. राहुल तसं विधान केलं तर औरंगजेबाची औलादच म्हणायला पाहिजे त्याला. त्याच्यावर किती चर्चा करायची. त्याला ठेचा ना. किती वेळ लागतोय, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
सोलापूरकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आमदार अमोल मिटकरींनी राज्यपालांकडे केली आहे. राज्यापालांना आमदार अमोल मिटकरींनी पत्र पाठवलं आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमात हे पत्र त्यांनी दिलं. सोलापुरकरने माफी मागीतली असली तरी त्याला माफ करू नये अशी पत्रात मागणी करण्यात आली आहे.