कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, महाराष्ट्राची सुटका…
माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली. चांगला निर्णय घेण्यात आला. या आधीच हा निर्णय घ्यायला हवा होता. आता घेतला. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती. ती झाली. पण केंद्राने निर्णय घेतला ही चांगली बाब आहे, असं शरद पवार म्हणाले.
वर्धा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर झाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं विरोधकांनी स्वागत करतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकाही सोडली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बरं झालं महाराष्ट्राची घाण गेली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्राची सुटका झाली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शरद पवार हे वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली. चांगला निर्णय घेण्यात आला. या आधीच हा निर्णय घ्यायला हवा होता. आता घेतला. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती. ती झाली. पण केंद्राने निर्णय घेतला ही चांगली बाब आहे, असं शरद पवार म्हणाले.
त्या निर्णयाची चौकशी करा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संविधानविरोधी निर्णय घेतले होते. त्याची चौकशी झाली पाहिजे का? असा सवाल करण्यात आला. त्यावर, संविधानाच्या विरोधात जे काही झालं असेल त्याची चौकशी व्हावी, असं शरद पवार म्हणाले.
पदाची शोभा झाली
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे, असं जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बाहुले बनू नये
महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो. नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा- सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ! या महामानवांचा जयघोष जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये केला आहे.
गुलाबराव पाटील म्हणतात…
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यपालांची मानसिकता राजीनामा देण्याची होती. त्यांची वेळ पण संपलेली होती. लोकांचा रोष ओढून घेण्यापेक्षा त्यांनी राजीनामा दिला.
त्यांच्याकडून ती चांगले कामे झाली त्याबद्दल त्यांचे आभार. त्यांच्याकडून काही गोष्टी झाल्या असतील, पण पुढच्या काळामध्ये असं होऊ नये. कोणीही महाराजांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य करू नये एवढीच अपेक्षा आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.