तुळजाभवानी नवरात्र उत्सव, रोज 60 हजार भाविकांना मिळणार प्रवेश, प्रशासनाची जय्यत तयारी

संतोष जाधव

| Edited By: |

Updated on: Sep 28, 2021 | 12:52 AM

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात दररोज 60 हजार भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. तर नवरात्र काळात 3 दिवस उस्मानाबादमध्ये जिल्हाबंदी असणार आहे.

तुळजाभवानी नवरात्र उत्सव, रोज 60 हजार भाविकांना मिळणार प्रवेश, प्रशासनाची जय्यत तयारी
तुळजाभवानी नवरात्र उत्सव, रोज 60 हजार भाविकांना मिळणार प्रवेश, प्रशासनाची जय्यत तयारी

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात दररोज 60 हजार भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. तर नवरात्र काळात 3 दिवस उस्मानाबादमध्ये जिल्हाबंदी असणार आहे. या काळात तुळजापूर येथे संचारबंदी आदेश लागू असणार आहे. पौर्णिमाला कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यासह देशभरातून नागरिक तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या 3 दिवसात एकही वाहन किंवा भाविक जिल्ह्यात येऊ दिला जाणार नाही.

उस्मानाबादमध्ये ‘या’ 3 दिवसांसाठी कडक संचारबंदी

पौर्णिमेच्या आगोदर एक दिवस पोर्णिमे दिवशी आणि पोर्णिमे नंतर एक दिवस असे तीन दिवस तुळजापूरात संचारबंदी राहील तर उस्मानाबाद जिल्हा सीमाबंदी लागू असणार आहे. या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करून तिथे पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी यांचा कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्त बैठकीत संबंधित निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.

लसीकरण केले असेल तरच प्रवेश

नवरात्र काळात ज्या भाविकांनी कोरोना लसीचे 2 डोस पूर्ण केले आहेत त्यांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा 29 सप्टेंबर रोजी होणार असून 7 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या काळात देवीचा नवरात्र उत्सव होणार आहे. त्यात 7 ऑक्टोबर घटस्थापना दिवशी पासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असणार आहे. तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी आणि परिसरात कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार असून सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स हे नियम पाळावे लागतील.

असा असेल नवरात्र उत्सव कार्यक्रम व अलंकार पूजा विधी

शारदीय नवरात्र महोत्सवास 29 सप्टेंबर रोजी मंचकी निद्राने सुरुवात होणार आहे. या काळात देवीची मुर्ती शेजघरात निद्रेसाठी ठेवली जाते. 7 ऑक्टोंबर रोजी देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापनाकरून घटस्थापना होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी श्री देवीची नित्‍योपचार पूजा व रात्री छबीना, 9 ऑक्टोंबर रोजी रथअलंकार महापूजा, 10 ऑक्टोबरला ललित पंचमी असल्याने मुरली अलंकार महापूजा, 11 ऑक्टोंबरला शेषशाही अलंकार महापूजा, 12 ऑक्टोबरला भवानी तलवार अलंकार महापूजा, 13 ऑक्टोबरला महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा, 14 ऑक्टोबरला घटोत्थापन आणि 15 रोजी विजयादशमी दसरा असल्याने पहाटे सिमोल्लंघन हा विधी होणार आहे. त्यांनतर 19 ऑक्टोबर रोजी मंगळवारी कोजागीरी पोर्णिमानंतर श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने अन्नदान अशा प्रकारे शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होईल, अशी माहिती महंत तुकोजी बुवा यांनी दिली.

अधिकाऱ्यांवर विविध जबाबदाऱ्या

आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने मंदिर संस्थानातर्फे जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे तुळजापूरात शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होणारी पौर्णिमेची 3 दिवसीय यात्रा रद्द पण भावीकांना दर्शन घेता येणार आहे, असे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रसिद्धी कार्यालयाच्या माध्यमातून कळविले आहे.

नगरपालिकेने बसविलेले काही ठिकाणचे सी.सी.टी.व्ही.कॅमेरे सुरु करण्याची गरज असेल तर तेही काही मंदिर संस्थानतर्फे करण्यात येणार आहे. समाज विघातक आणि समाज कंटकाच्या हद्दपारीची कार्यवाही पोलिसांनी तातडीने करावी. तसेच समाज माध्यमातून जनतेत भितीचे वातारण पसरवणाऱ्यांचाही बंदोबस्त करावा. अवैध दारु आणि अंमली पदार्थावर बारीक नजर ठेवण्यात यावी. याबाबत राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांनी स्वत: लक्ष घालावे, असे आदेशीत केले आहे.

बैठकीला कोणकोण मान्यवर उपस्थित?

नवरात्र उत्सव बैठकीस जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक निवा जैन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजीतसिंह पाटील,नगराध्यक्ष सचिन रोचकरी,उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार योगिता कोल्हे,सौदागर तांदळे, पोलीस निरीक्षक अजीनाथ काशीद, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, जनसंपर्क अधिकारी वाय.एम.बागुल, न.पा.चे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह भराडे, तालुका आरोग्य अधिकारी सुहास पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंचला बोडके, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक विजय चिंचाळकर, एस.टी.चे विभागीय नियंत्रक अमृता ताम्हणकर, अश्वजीत जानराव, जिल्हा पुरवठा विभागातील सचिन काळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस.व्ही.घोडके, कर्नाटक एस.टी. महामंडळाचे आर.बी.जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेल्लोरे, महामार्गचे देवेंद्रसिंग, राष्ट्रीय महामार्गाचे अनिल विपट, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एम.डी.बोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : तुळजाभवानी देवीचे मंदिर आकर्षक रोषणाईने उजळले, ‘आई साहेब’ आणि ‘आई राजा उदो उदो’ची रोषणाई, भक्तांची पाहण्यास गर्दी

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI