दोन दिवसांपूर्वी सोमय्यांची तक्रार घेतली, आज R R आबांचा सख्खा भाऊ पोलीस सेवेतून निवृत्त!

भूषण पाटील

| Edited By: |

Updated on: Sep 30, 2021 | 3:17 PM

राजाराम रामराव पाटील हे तात्या म्हणून परिचीत आहेत. भाऊ मंत्री होता, वहिनी आमदार, घरी मोठा राजकीय वारसा, तरीही तात्यांनी त्याचा बडेजाव केला नाही. राजाराम पाटील हा पोलीस दलातील अत्यंत साधा-सरळ माणूस म्हणून ओळखले जातात. कामावरील निष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांनी पोलीस दलात आपला वेगळा लौकीक जपला.

दोन दिवसांपूर्वी सोमय्यांची तक्रार घेतली, आज R R आबांचा सख्खा भाऊ पोलीस सेवेतून निवृत्त!
R R Patil

कोल्हापूर : करवीरचे पोलीस उपअधीक्षक (DYSP) राजाराम रामराव पाटील हे आज पोलीस सेवेतून निवृत्त झाले आहेत. राजाराम पाटील हे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री आर आर पाटील यांचे सख्खे भाऊ आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर सोमय्यांनी कोल्हापूरमध्ये जाऊन कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी हे संपूर्ण प्रकरण राजाराम पाटील यांनी अतिशय नाजूकपणे हातळलं होतं.

राजाराम रामराव पाटील हे तात्या म्हणून परिचीत आहेत. भाऊ मंत्री होता, वहिनी आमदार, घरी मोठा राजकीय वारसा, तरीही तात्यांनी त्याचा बडेजाव केला नाही. राजाराम पाटील हा पोलीस दलातील अत्यंत साधा-सरळ माणूस म्हणून ओळखले जातात. कामावरील निष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांनी पोलीस दलात आपला वेगळा लौकीक जपला.

शेवटच्या दिवशी आईला सॅल्युट

राजाराम पाटील हे आज पोलीस सेवेतील आपल्या शेवटच्या दिवसाचं कर्तव्य पार पाडत आहेत. पोलीस सेवेतील अखेरच्या दिवशी कर्तव्यावर जाताना त्यांनी आपल्या मातेला सॅल्युट करुन, कृतज्ञता व्यक्त केली. तात्यांच्या या हळवेपणामुळे, त्यांच्यातील सच्चेपणाचं दर्शन घडतं.

दोनवेळा राष्ट्रपती पदकाने सन्मान

राजाराम पाटील यांची निष्ठा आणि कामातील तत्परतेसाठी त्यांना दोनवेळा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आलं. राजाराम पाटील यांचा सख्खा भाऊ आर आर आबा हे 12 वर्षे गृहमंत्री होते. मात्र तरीही तात्यांनी कधी त्याचा टेंबा मिरवला नाही. राजाराम पाटील हे कोल्हापुरात येण्यापूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली होती. ज्यावेळी त्यांची पिंपरीतून बदली झाली, त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकला होता. “स्वत:चा सख्खा भाऊ 12 वर्षे राज्याचा गृहमंत्री असतानाही राजाराम पाटलांनी कधी टेंबा मिरवला नाही. मात्र काही लोकांचे खूप खूप लांबचे नातेवाईक जरी गृहमंत्री असला तरी असा टेंबा मिरवला जातो, जसं काही गृहखातं हेच चालवतात. पण राजाराम पाटील त्यातले नाहीत”, असं अजित पवार म्हणाले होते.

माणुसकीतील राजा आणि वर्दीतील राम

महाराष्ट्र पोलिस दलात 1987 मध्ये ते फौजदार म्हणून रुजु झाले. एमपीएससी परीक्षेचा अभ्यास आर. आर. पाटील (तात्या) करीत होते. त्याचवेळी राजकारणाचे धडे आर.आर. पाटील (आबा) गिरवत होते. एक भाऊ फौजदार आणि दुसरा जिल्हा परिषद सदस्य असा अनुभव तासगाव तालुक्यातील अंजनी या गावाने त्यावेळेस घेतला.

अंजनी या मूळ गावातच दोन्ही बंधूंचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण झाले. पोलिस दलात फौजदार, सहाय्यक निरीक्षक आणि निरीक्षक असे पदोन्नतीचे टप्पे तात्यांनी गाठले. तर दुसरीकडे राजकारणात जिल्हा परिषद सदस्य, आमदार, मंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदार्यंत आबांनी गवसणी घातली.

एका सामान्य शेतकरी कुटुंबात आर.आर. पाटील बंधुंनी जन्म घेतला. शेतात काबाडकष्ट करणाऱ्या आईवडिलांबरोबर मोलमजुरीही कधीकाळी केली. प्रचंड कष्ट, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर दोघांनी आपआपल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली. वडिलांचे छत्र हरपल्याने आई हेच त्यांचे सर्वस्व बनले. आईसाठी व्याकूळ होणाऱ्या या भावांनी एक आदर्श कौटुंबिक उदाहरण जगासमोर ठेवले. वैवाहिक जीवनातही तात्या कुटुंब वत्सल माणूस म्हणूनच वावरले. दोन मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांनी पत्नीवर टाकली आणि आपल कर्तव्य बजावत राहिले. कुटुंबवत्सल स्वभावाच्या तात्यांनी समाजमनाचीही मने जिंकली. माणुसकीचा खळाळता झरा असेच त्यात्यांकडे पाहिले जाते. त्यांचा मित्र परिवार अगाध आहे. जो त्यांच्या संपर्कात येतो तो मित्र होतोच आणि चिरकाळ टिकतो. माणुसकी आणि धार्मिकता हे तात्यांच्या स्वभावातील वीकपाँईंटच म्हणावे लागतील. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी त्यांच्या स्वभावात आहे.

कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी तात्या नेहमीच आतुरलेले असतात, हे कोल्हापूरकर जवळून जाणतात. जरी बाहेर कोठे बदली झाली तरी ते नवरात्रोत्सव काळात कोल्हापूरचा बंदोबस्त मागून घेत असत. अंबाबाई आणि जोतिबाची सेवा करायला मिळावी हाच त्यामागचा हेतू असल्याचे ते सांगतात. पोलिस अधिकारी असणाऱ्या तात्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. राजकारणात त्यांना कोणत्याही पक्षाचे वावडे नाही. सर्वपक्षीय नेते त्यांचे मित्र आहेत. इतकेच नव्हे तर सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातही त्यांचा मोठा मित्र परिवार आहे.

सख्खा भाऊ गृहमंत्री, तरीही तात्या साईड ब्राँचला

राजकारणात मोठ्या पदावर असणाऱ्या काही नेत्यांचे नातेवाईक कसा गैरफायदा उठवतात हे जग जवळून पाहतेय. दलालीपासून खंडणीपर्यंतच्या अनेक कथा या मंडळींच्या ऐकायला मिळतात. याचा लवलेशही आर.आर. बंधूंच्या वर्तनात कधी जाणवला नाही. म्हणूनच दोघा आर.आर.पाटील बंधुंनी एकमेकांपासून अलिप्त राहणेच पसंत केले. विशेष म्हणजे आबा गृहमंत्री असताना त्यांचा दौरा जर आपल्या कार्यक्षेत्रात असेल तर तात्या तो बंदोबस्तसुद्धा टाळत होते. त्यांच्या जवळ जाणे तर लांबच राहिले. आपण आबांचे सख्खे भाऊ आहोत हे कोणाला कळणार नाही, याचीही दक्षता तात्या नेहमीच घेत आले. पिंपरी चिंचवडला सहाय्यक पोलिस आयुक्त असताना त्यांचा विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार झाला. त्या समारंभात पवार यांनी तात्यांचे कौतुक करताना अक्षरशः स्तुती सुमने उधळली. सख्खा भाऊ गृहमंत्री असताना तात्यांनी साईड ब्रँचला नोकरी केल्याच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.

तात्यांच्या या स्वभावामुळे त्यांना रामाची उपमाही दिली जाते. राजघराण्यात जन्मलेला राम सत्यवचनी होता. जेव्हा वनवास भोगण्याची वेळ आली तेव्हा त्याने तो आनंदाने स्वीकारला. तोच प्रकार तात्यांच्याबाबतीत घडल्याचे त्यांचे जवळचे मित्र सांगतात. आबा गृहमंत्री असताना तात्यांनी नागरी हक्क संरक्षण दलात नियुक्ती पत्करली. ही शाखा म्हणजे साईड ब्रँच समजली जाते. जोपर्यंत आबा गृहमंत्री राहिले, तोपर्यंत तात्या या ब्रँचमध्ये थांबले. राज्याच्या पोलिस दलाचा प्रमुख असणाऱ्या आपल्या भावाला कोठे अडचण निर्माण होऊ नये, म्हणून त्यात्यांनी एकप्रकारे भोगवलेला वनवासच होता, असे तात्यांचे मित्र अभिमानाने सांगतात. पोलिस दलात नोकरी करताना तात्यांनी स्वतःसाठी आचारसंहिता पाळली हे त्यांनी कृतीतून दाखविले. माणुसकीबाबत जेवढे हाळवे तेवढेच कर्यव्यकठोर तात्या परिचित आहेत. एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना ते अत्यंत शिस्तबद्धरित्या करत. त्यांच्या सेवाकाळात केलेल्या उल्लेखनीय तपासासाठी त्यांना दोनदा राष्ट्रपतींचे पदक मिळाले आहे. दोनवेळा पदक मिळवणाऱ्या निवडक अधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव कोरले गेले आहे.

मुंबईत फौजदार म्हणून नोकरी करताना त्यांना पोलिस निरीक्षक मधुकर झेंडेंचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर त्यांनी शिवप्रतापसिंह यादव, भगवंतराव मोरे, माधवराव सानप, आर. के. पद्मनाभन, संजयकुमार, मनोजगुमार शर्मा या पोलिस अधिक्षकांऱ्याबरोबर काम केले. पिंपरी चिंचवडचे आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याबरोबर काम केल्यानंतर ते अखेरच्या टप्यात करवीरचे डीवायएसपी म्हणून रुजु झाले. अभिनव देशमुख आणि शैलेश बलकवडे हे त्यांच्या सेवाकाळातील अखरेचे पोलिस अधीक्षक होत. असे हे आर आर पाटील आज सेवानिवृत्त होत आहेत त्यांना शुभेछा.

संबंधित बातम्या 

R R आबांच्या सख्ख्या भावाने मुश्रीफांविरोधात तक्रार स्वीकारली, सोमय्या म्हणाले, आबा यांच्यासारखे नव्हते!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI