अभिनेत्री सारखा डाएट, राजासारखा रुबाब, ‘चेतक फेस्टिव्हल’मध्ये आलेल्या ‘या’ अस्सल घोड्यांची किमत काय?

| Updated on: Dec 14, 2022 | 9:58 AM

सारंगखेडा घोडेबाजारात दाखल झालेल्या महागड्या घोड्यांची विक्री हे मालक करत नसतात. अश्वप्रदर्शनासाठी हे घोडे सारंगखेडा येथे दाखल होतात.

अभिनेत्री सारखा डाएट, राजासारखा रुबाब, चेतक फेस्टिव्हलमध्ये आलेल्या या अस्सल घोड्यांची किमत काय?
'चेतक फेस्टिव्हल'मध्ये आलेल्या 'या' अस्सल घोड्यांची किमत काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नंदूरबार: अश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारात दोन हजार घोडे दाखल झाले असले तरी बाजारात चर्चा आहे ती शनाया आणि शेराची. त्यांचा रुबाब आणि चाल पाहण्यासाठी अश्व प्रेमींनी सारंगखेड्याच्या बाजारात गर्दी केली आहे. एखाद्या राजासारखा शेराचा रुबाब आहे. तर शनायाचा तोरा एखाद्या अभिनेत्रीपेक्षा काही कमी नाही. शनायाचा डाएट खुराक एखाद्या अभिनेत्रीसारखाच आहे. शिवाय या दोन्ही घोड्यांची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. शेरा आणि शनायावर एक दोन लाख नव्हे तर तब्बल 70 लाखाची बोली लावली गेली आहे, मात्र मालकांनी याला घोड्यांना विकलेलं नाही.

सारंगखेड्याच्या घोडे बाजारात चर्चा आहे, ती पंजाबमधून दाखल झालेला अवघ्या 32 महिन्याच्या शनायाची. तिची डौलदार चाल, उंची, शुभ लक्षणे आणि त्याच सोबत तिच्या किमतीची सध्या या बाजारात जोरदार चर्चा आहे. हा पांढराशुभ्र नुकरा जातीचा अश्व आहे.

हे सुद्धा वाचा

शनायाचे कान मारवाड आहेत. तिची उंची 72 इंच इतकी आहे. ही देशातील सर्वात उंच घोडी आहे. तिची उंची अजून वाढणार असल्याने या शनायाने सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. एका अश्व शौकिनाने तिची किमत 70 लाख लावली आहे. मात्र घोडीचे मालक निर्भय सिंग यांनी तिची विक्री करण्यास नकार दिला. शनायाचा खुराक एखाद्या अभिनेत्रीच्या डाएटप्रमाणेच आहे. तिची काळजी देखील तशीच घेतली जात आहे. तिला दररोज 5 किलो सफरचंद, 10 लिटर दूध आणि अन्य खुराक दिला जात असतो.

घोड्याची किमत त्याची उंची रंग आणि चाल यावर ठरत असते. घोडा जितका रुबाबदार तितकी त्याची किमत तितकी जास्त असते. सारंगखेड्याचा घोडे बाजारात आणखी एक घोडा दाखल झालाय. त्याचं नाव शेरा आहे. त्याचीही किमत एक लाख नाही दोन लाख नाही तर तब्बल 51 लाख आहे. आपल्याला प्रश्न पडला असेल याची किमत इतकी का? सारंगखेडा घोडा बाजरात जवळपास दोन हजार घोडे आहेत. पण त्यात शेराचा रुबाब काही औरच आहे.

एखाद्या राजाप्रमाणे शेरा रुबाबदार दिसतो. त्याची उंची 63 इंच आहे. त्याची चाल रुबाबदार आहे. त्याची सेवा करण्यासाठी 24 तास 4 मजूर राबतात. त्याच्या खानपानाची विशेष काळजी घेतली जाते. त्याला दररोज पाच लिटर दूध, एक किलो गावरान तूप, चणाडाळ, गहू आणि बाजरी दिली जाते. सोबत कोरडा आणि सुका चारा दिला जात असतो, अशी माहिती शेराचे मालक दीपक यांनी सांगितलं.

सारंगखेडा घोडेबाजारात दाखल झालेल्या महागड्या घोड्यांची विक्री हे मालक करत नसतात. अश्वप्रदर्शनासाठी हे घोडे सारंगखेडा येथे दाखल होतात. या घोड्यांच्या ब्लडलाईन आणि इतर गोष्टींमुळे ते अश्व पैदासाठी वापरले जातात. त्यातून या घोड्या मालकांना कोट्यवधी रुपयांचा फायदा होत असल्याचं अश्वतज्ज्ञ जयपाल सिंह रावल सांगतात.

18 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विश्व सौंदर्य स्पर्धांपासून सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये अधिक रंगत येणार आहे. कोट्यवधी किमतीचे घोडे खरेदी करण्याची आपली क्षमता नसली तरी कोट्यवधी आणि लाख मोलाचे घोडे पाहण्यासाठी चेतक फेस्टिवल भेट देणे जरुरीचे आहे.