मरणानेही छळले, स्मशानात जळत्या चितेवर सिमेंट काँक्रीटचा स्लॅब पडला, पार्थिव दबले गेले

| Updated on: Jul 18, 2021 | 3:00 PM

पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर काही क्षणातच मोठा आवाज झाला. सिमेंट काँक्रीटच्या शेडचा बांधलेला स्लॅब अचानक खाली कोसळला. त्याखाली पार्थिव आणि सरण पूर्णपणे दबले गेले

मरणानेही छळले, स्मशानात जळत्या चितेवर सिमेंट काँक्रीटचा स्लॅब पडला, पार्थिव दबले गेले
Follow us on

यवतमाळ : ‘शेवटचा दिस हा गोड व्हावा’ अशी भारतीय संस्कृतीत अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यात महिलेच्या अंत्यसंस्कारावेळी चक्क सिमेंट काँक्रीटचे शेड अचानक जळत्या चितेवर कोसळले. यामुळे चितेवरील पार्थिव त्याखाली दबले जाऊन अर्धवटच जळाले. पुसद तालुक्यातील निंबी येथे शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या विचित्र प्रकारामुळे ग्रामपंचायतीने केलेल्या निकृष्ट बांधकामाचे पितळ उघडे पडले. यामुळे निंबी शिवारात नागरिकांनी संताप व्यक्त केला.

नेमकं काय घडलं?

पुसदपासून चार किलोमीटर अंतरावरील निंबी येथील रहिवासी महिला रुक्मा साहेबराव हराळ (वय 55 वर्ष) यांचे शनिवारी सकाळी आठ वाजता कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या अंत्य संस्कारासाठी नातेवाईक आणि परिसरातील नागरिक जमले होते. दुपारी तीन वाजता स्मशानभूमीत ग्रामपंचायतीने बांधलेल्या दहन शेडमध्ये सरण रचण्यात आले.

पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर काही क्षणातच नकळत मोठा आवाज झाला. त्याचवेळी सिमेंट काँक्रीटच्या शेडचा बांधलेला स्लॅब अचानक कोसळला. त्याखाली पार्थिव आणि सरण पूर्णपणे दबले गेले. अचानक घडलेल्या या घटनेने सर्व जण अवाक् झाले. सरणाजवळ जमलेली मंडळी बाजूला सरकल्याने प्राणहानी टळली. सिमेंट काँक्रीटच्या स्लॅबखाली दबलेल्या पार्थिव आणि सरणाला बाहेर कसे काढावे? असा मोठा प्रश्न अंत्यसंस्काराला जमलेल्या नागरिकांना पडला.

लोकप्रतिनिधींवर गावकऱ्यांचा संताप

दरम्यान सरपंच आणि ग्रामसेवकांना ही घटना कळवण्यात आली. परंतु सायंकाळपर्यंत घटनास्थळी कुणीही पोहोचले नव्हते. या दहन शेडचे ग्रामपंचायतीने तीन वर्षापूर्वीच बांधकाम केलेले आहे. निकृष्ट बांधकामामुळे हा अपघात घडला. याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

संबंधित बातम्या :

एकमेकांपासून 50 फूट अंतरावर दोन मध्यमवयीन पुरुषांचे मृतदेह, सांगलीत खळबळ

शहापुरात धरणाच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू, तब्बल 24 तासांनंतर मृतदेह सापडला

(Yawatmal Pusad Cemetery Cement Concrete Shed Slab falls on Dead Body during Funeral last rites)