‘अकरावीला प्रवेश देताना CBSE, ICSE विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण गृहित धरु नये’

CBSE आणि ICSE विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे अकरावीला प्रवेश देताना या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण गृहित धरु नये, अशी सूचना आज कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि पालकांनी केली आहे.

‘अकरावीला प्रवेश देताना CBSE, ICSE विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण गृहित धरु नये’

मुंबई : राज्य मंडळाच्या (SSC) दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा अंतर्गत 20 गुण बंद करण्यात आल्याने त्यांना लेखी परीक्षेला मिळालेल्या गुणांच्या आधारावरच अकरावीचे प्रवेश मिळणार आहेत. मात्र, दुसरीकडे सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसईच्या (ICSE) विद्यार्थ्यांना मात्र, अंतर्गत गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची गुणांची टक्केवारी वाढणार आहे. याचा विचार करुन अकरावीला प्रवेश देताना सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण गृहित धरु नये, अशी सूचना आज कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि पालकांनी केली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ते मुख्याध्यापक आणि पालकांशी चर्चा केल्यानंतर बोलत होते.

राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्यात आलेले नसल्यामुळे सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षेचे अंतर्गत गुण अकरावीच्या प्रवेशावेळी ग्राह्य धरण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी मुख्याध्यापक आणि पालकांनी शिक्षणमंत्री तावडे यांच्याशी झालेल्या बैठकीत केली. मुख्याध्यापक आणि पालकांनी दिलेल्या या सूचनेसंदर्भात राज्य सरकारच्यावतीने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री, त्याचप्रमाणे सीबीएसई, आयसीएसई मंडळाशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती तावडेंनी दिली. दोन्ही मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेचे गुण अकरावी प्रवेशासाठी ग्रहीत धरल्यास विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया समान पातळीवर आणता येईल, असा विचार मुख्याध्यापक आणि पालकांनी आज झालेल्या बैठकीत मांडल्याचेही तावडेंनी यावेळी नमूद केले.

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळणार नाही?

मागील काही वर्षांची अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची आकडेवारी पाहता आयबी, आयजीसीएसई आदी बोर्डाचे केवळ 7 ते 9 इतके कमी संख्येने विद्यार्थी प्रवेश घेतात. सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाचे जवळपास साडेचार टक्के विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेतात. ही वस्तुस्थिती असल्याची बाब विनोद तावडेंनी निदर्शनास आणली. या विषयावर बोलताना तावडे म्हणाले, “अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या मुलांना प्राधान्य मिळेल आणि राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळणार नाही, अशी अनाठायी भिती व्यक्त केली जात आहे. या संदर्भात मुख्याध्यापक आणि पालकांनी आजच्या बैठकीत ज्या सूचना दिल्या त्याचा विचार करण्यात येईल”

‘कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही’

यंदाच्या परीक्षेत राज्य मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन झाले आहे. त्याआधारे पुढे जाऊन विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम सुरु ठेवला पाहिजे. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता राज्य सरकारकडून घेण्यात येत आहे, असेही आश्वासन तावडेंनी दिले. या बैठकीच्यावेळी शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रतिनिधी, जवळपास 15 शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि पालक उपस्थित होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *