कुठे नाराजी तर कुठे जल्लोष, भाजपच्या पहिल्या यादीनंतर आतल्या घडामोडी काय?

भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर त्या त्या मतदारसंघात काय-काय हालचाली घडत आहेत, याची माहिती जाणून घेऊयात. पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीनाथ भीमाले नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. 

कुठे नाराजी तर कुठे जल्लोष, भाजपच्या पहिल्या यादीनंतर आतल्या घडामोडी काय?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 7:56 PM

भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत अनेक विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपची पहिली यादी जाहीर होण्याआधी काही ठिकाणी उमेदवारीवरुन रस्सीखेच बघायला मिळाली होती. तसेच उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर काही ठिकाणी इच्छुकांकडून नाराजी देखील व्यक्त होत आहे. राज्यात भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काय-काय घडलं? याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर त्या त्या मतदारसंघात काय-काय हालचाली घडत आहेत, याची माहिती जाणून घेऊयात.

पर्वती विधानसभा मतदारसंघात श्रीनाथ भीमाले नाराज

पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीनाथ भीमाले नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. “कार्यकर्त्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात निर्णय घेणार, अशी उघड भूमिका भीमाले यांनी जाहीर केली आहे. भाजपचे माजी नगरसेवक श्रीनाथ भीमाले हेही पर्वतीमधून इच्छुक होते. पक्षाकडे मी उमेदवारी मागितली होती. माझी नाराजी कायम आहे”, अशी प्रतिक्रिया श्रीनाथ भीमाले यांनी दिली.

नाशिकमध्ये सीमा हिरे यांना उमेदवारी, दिनकर पाटील नाराज

भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतरही सीमा हिरे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. यादी जाहीर होण्यापूर्वी भाजपच्या स्थानिक पदाधिकारी, नगरसेवकांकडून सीमा हिरे यांच्या उमेदवारीला विरोध केला जात होता. नाशिकमध्ये भाजपमध्ये सगळ्यात जास्त इच्छुक उमेदवार होते. सगळ्यात जास्त इच्छुक असलेल्या मतदारसंघातून सीमा हिरे यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. अन्य इच्छुक उमेदवारांची नाराजी पक्षश्रेष्ठी कशी दूर करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे भाजप नेते दिनकर पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

पिंपरी चिंचवडमधलं बंड शमलं?

पिंपरी चिंचवडमध्ये विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचं तिकीट कापून शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर झालीय. यानंतर अश्विनी जगताप यांनी प्रतिक्रिया दिली. उमेदवरीवरून आमच्या दोघांमध्ये कधीच वाद नव्हता. “आमच्या घरात उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानते. आधीच सांगितलं होतं. दोघांपैकी ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम करणार. आमच्यात अंतर्गत कलह कधीच नव्हता”, असं अश्विनी जगताप यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे महायुतीतील बंडावरून उमेदवार शंकर जगतापांची सावध भूमिका घेतली. “मला उमेदवारी दिली. पक्षश्रेष्ठींसह महायुतीतील नेत्यांचे आभार मानतो. जगताप कुटुंबावर पुन्हा विश्वास दाखवला. तिकीट मिळेपर्यंत ही स्पर्धा असते. आता उमेदवारी जाहीर झाली आहे. आता ही स्पर्धा थांबेल. यावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यावर तोडगा काढतील, अशी प्रतिक्रिया उमेदवार शंकर जगताप यांनी दिली.

वाशिमची जागा मिळण्याची अपेक्षा, भाजपा आमदार लखन मलिक यांची प्रतिक्रिया

भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये माझं नावं राहील, असा विश्वास आमदार लखन मलिक यांनी व्यक्त केला आहे. “भाजप पक्षाने मला चार वेळा आमदारकीची संधी दिली. आणखी एकदा संधी द्यावी, अशी माझी पक्षाला विनंती आहे. भाजप पक्ष जो आदेश देईल त्या पद्धतीने मी काम करेन. पक्षाने संधी दिल्यास मी काम करेन. पक्षाने थांबा म्हटलं तर मी थांबेन. मी कोणत्याही प्रकारचं रिकामं काम करणार नाही. सध्या पहिली यादी जाहीर झालेली आहे, दुसरी यादी येत्या दोन-तीन दिवसात जाहीर होईल. त्या यादीमध्ये माझं नाव राहण्याची शक्यता आहे”, अशी प्रतिक्रिया आमदार लखन मलिक यांनी दिली.

सांगोला विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा

सांगोला विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. सांगोला विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. जरांगे फॅक्टरचा आणि दीपक आबा साळुंखे पाटील यांचा कसलाही परिणाम सांगोला विधानसभा मतदारसंघावर होणार नसल्याचे भाजपचे अध्यक्ष चेतन केदार यांनी सांगितले. सांगोला विधानसभेची जागा भाजपला मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याने उद्या देवेंद्र फडणवीस यांना भेटून मागणी करणार, अशी प्रतिक्रिया चेतन केदार यांनी दिली. सांगोला विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार भरघोस मताने निवडून येईल, असा दावा करत महाविकास आघाडीचे कसलेही आव्हान नसल्याचे केदार यांनी सांगितले.

मनोज जरांगे यांचा लढा हा आरक्षणासाठी नसून फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी असल्याचा आरोप केदार यांनी केला. मनोज जरांगेंचे बोलवता धनी वेगळे आहेत. चार वेळा ते मुख्यमंत्री होते. त्यावेळेस मराठा आरक्षणाचा का मुद्दा पुढे आला नाही? असे म्हणत जरागे यांच्या मागे शरद पवार यांचा हात असल्याचे अप्रत्यक्षपणे चेतन केदार यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील विद्यमान चारही आमदारांना भाजपकडून पुन्हा संधी

भाजपच्या पहिल्याच यादीत जळगाव जिल्ह्यातील विद्यमान चारही आमदारांना भाजपकडून पुन्हा संधी देण्यात आली. विशेष म्हणजे भाजप नेते गिरीश महाजन यांना सलग सातव्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. तर आमदार सुरेश भोळे , आमदार संजय सावकारे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली. मंगेश चव्हाण यांना दुसऱ्यांदा भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली. लोकसभेत उमेदवारी ना मिळाल्यामुळे नाराज असलेल्या अमोल जावळे यांना रावेर मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला आहे. जामनेर मतदारसंघातून गिरीश महाजन, जळगाव शहर मतदारसंघातून आमदार सुरेश भोळे, भुसावळ मतदारसंघातून संजय सावकारे तसेच चाळीसगाव येथून आमदार मंगेश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पहिली यादी जाहीर केली असून यात जळगाव जिल्ह्यातील पाच उमेदवारांचे नाव जाहीर केली आहेत. यात जामनेरमधून गिरीश महाजन, रावेरमधून अमोल जावळे भुसावळ संजय सावकारे चाळीसगावमधून मंगेश चव्हाण तर जळगाव शहरातून सुरेश भोळे यांना उमेदवारी जाहीर झाल्या आहेत.

जळगावात सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी

जळगाव शहरातून आमदार सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. “तिसऱ्यांदा भाजप पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला त्यांचे मी आभार मानतो. देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर नेते असतील या सर्वांचे मी आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया सुरेश भोळे यांनी बोलताना दिली आहे. “गेल्या दहा वर्षात अनेक कामे झालेली आहेत. मात्र काम पूर्ण झाले असे म्हणता येणार नाही. या कामांचा जोरावर जनता पुन्हा मला आशीर्वाद देईल आणि माझी हॅट्रिक होईल”, असा विश्वास आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केला आहे.

चाळीसगांवात मंगेश चव्हाण यांना दुसऱ्यांदा संधी

चाळीसगाव मतदारसंघातून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना पक्षाने दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “उतणार नाही, मातणार नाही, घेतलेल्या वसा टाकणार नाही, असं मंगेश चव्हाण म्हणाले आहेत. माझ्या वडिलांनी ग्रामपंचायतच्या कर्मचारी म्हणून काम केलं. त्यांच्या मुलाला पक्षाने दुसऱ्यांदा संधी दिली. पहिल्या यादीत माझं नाव असल्याने मला आनंद झाला. तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सहकाऱ्यांचे आणि नेत्यांचे आभार व्यक्त करतो”, असं मंगेश चव्हाण म्हणाले आहेत.

“पार्टीने 2019 ला मला संधी दिली त्या संधीचं सोनं करत मी तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केलं. भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेतृत्वाचे मी आभार मानतो. या संधीचं पुन्हा सोनं करून तालुक्याला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध राहीन. मायबाप जनतेचे निवडणुकीचे आभार व्यक्त करतो”, अशी देखील प्रतिक्रिया मंगेश चव्हाण यांनी दिली.

गोंदियात माजी आमदाराला पुन्हा एकदा संधी

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभेचे उमेदवारी माजी आमदार संजय पुराम यांना देण्यात आली आहे. संजय पुराम यांनी 2014 मध्ये भाजपकडून निवडणूक जिंकली होती. तर 2019 मध्ये त्यांना काँग्रेस उमेदवाराकडून पराभव स्वीकाराव लागला होता. त्यानंतर भाजपने 2024 च्या निवडणुकीत संजय पूराम यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविला असून त्यांना उमेदवारी दिली आहे.

अमरावती विद्यमान आमदाराला उमेदवारी

अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघातून भाजपचे आमदार प्रताप अडसड यांना पून्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. अडीच वर्षात केलेल्या विकास कामामुळे पुन्हा जनता मला निवडून देईल, असा विश्वास प्रताप अडसड यांनी व्यक्त केला आहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघांमधून भाजपचे माजी मंत्री जयकुमार रावल यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. जयकुमार रावल शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. जयकुमार रावल यांना सलग पाचव्यांदा भाजप तर्फे उमेदवारी जाहीर झाली आहे. पक्षश्रेष्ठींनी सलग पाचव्यांदा उमेदवारी जाहीर करून संधी दिल्याने रावल यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत.

ठाण्यात आमदार संजय केळकर यांना पुन्हा संधी

भारतीय जनता पार्टीकडून ठाणे मतदारसंघातून आज भाजप आमदार संजय केळकर यांचे नाव तिसऱ्यांदा जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कोर कमिटींना धन्यवाद देईन. पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन जनसेवेची पक्षाने संधी दिलेली आहे. कार्यकर्त्यांचे प्रेम आणि काम त्यासोबतच महायुतीतील कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि जनतेचा आशीर्वाद यांच्या जोरावर लोकसभेला महायुतीने हा गड पार केला. तसेच विधानसभेला हा गड निश्चितच पार करे”, अशी प्रतिक्रिया केळकर यांनी दिली.

नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले राम दर्शनाला

भाजपडून आज जाहीर झालेल्या भाजपच्या पहिल्या यादीत नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या नावाचा समावेश आहे. उमेदवारी जाहीर होताच भाजप आमदार राहुल ढिकले काळा राम मंदिरात दर्शनाला पोहोतले. त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत काळारामाचे दर्शन घेतले. “भारतीय जनता पार्टीच्या पार्लमेंटरी बोर्डातील लोकांनी विश्वास टाकला. गेल्या पाच वर्षात लोकांची कामे केली. सर्व कामाच्या बळावर जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत. आमच्या घरातला कुठलेही शुभकाम काळारामाच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. भाजप शिस्तबद्ध पक्ष आहे. भाजपात कमळ चिन्ह बघून काम करतात. वरिष्ठ नक्कीच त्यांची नाराजी दूर करतील”, अशी प्रतिक्रिया राहुल ढिकले यांनी दिली.

अहिल्यानगरमध्ये शिवाजी कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते शिवाजी कर्डिले यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत आनंद साजरा करण्यात आला. तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजय माझाच असा कार्डीले यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

सोलापुरात विजयकुमार देशमुख यांना सलग पाचव्यांदा उमेदवारी

भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांना सलग पाचव्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. सोलापूर शहर उत्तरमधून भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. “पक्ष नेतृत्वाने सलग पाचव्यांदा विश्वास ठेवून उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आभार. पक्षातील विरोधकांनी इच्छा व्यक्त केली तो त्यांचा अधिकार आहे. मात्र आता उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे ते आमच्यासोबत राहतील. विरोधकांना मी कमी समजत नाही”, मात्र आम्ही विजयी होऊ हे निश्चित, अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.