देहूत पोलिसांकडून रोखली जातेय दिंडी, वारकऱ्यांत नाराजी, फडणवीस नेमकं काय म्हणाले?
वारकऱ्यांच्या दिंड्या देहुमध्ये रोखल्या जात आहेत. याबाबत वारकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा तसेच वारीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक वारकरी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र तसेच देशभरातून वारकरी देहूत जमत आहेत. असे असताना आता देहूमध्ये पोलिसांकडून दिंड्या रोखण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे वारकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय.
देहुकडून जगद्गुरू संत तुकोबांच्या पालखीचं पंढरपुराकडे प्रस्थान झालं आहे. दुसरीकडे अनेक वारकरी देहूमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी वारकरी टाळ आणि मृदुंगाच्या जयघोषात विठ्ठालाचा जयघोष करत आहेत. दुसरीकडे मात्र वारकऱ्यांच्या दिंड्या देहूमध्ये रोखल्या जात आहेत.
फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण
पोलिसांनी वारकऱ्यांना अडवून ठेवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी या ठिकाणी जी सुव्यवस्था ठेवायला हवी त्याच पद्धतीने सर्व व्यवस्था केलेली आहे. एकावेळी सगळ्यांना सोडलं तर येथे चेंगराचेंगरी होईल. त्यामुळे थोडे-थोडे वारकरीच सोडावे लागतील. वारकऱ्यांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आमचा वारकरी हा शिस्तीत दर्शन घेईल
तसेच, आपला वारकरी एक-दोन तास थांबवं लागलं याची परवा करत नाही. माऊलीच्या भेटीकरिता वारकरी अनेक किलोमीटर पायी जातो. त्यामुळे आमचा वारकरी हा शिस्तीत दर्शन घेईल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
वारकरी विठ्ठलभक्तीत तल्लीन
दुसरीकडे कुटूंबाची सर्व चिंता सोडून विठूरायाच्या दर्शनाला वारकरी पंढरीला निघाले आहेत. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरहून निघाली असून हजारो महिला पुरूष वारकरी विठ्ठलभक्तीत तल्लीन झाले आहेत. अनेक वर्षांपासून विठूरायाच्या दर्शनाची आस घेऊन कुटूंबांची सर्व चिंता सोडून वारकरी भक्तीरसात डूंबून गेले आहेत. विठ्ठलनामाचा जयघोष करत, गौळणी म्हणत महिलाही आनंदाने मार्गक्रमण करत आहेत.
