
महापालिका निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या, तर शिवसेना शिंदे गट हा दुसऱ्या क्रमांकांचा पक्ष ठरला आहे. परंतु जरी राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अनेक महापालिका अशा आहेत, जिथे भाजपला स्वबळावर बहुमत मिळवला आलेलं नाही, महापौर पदासाठी भाजपला आपल्या मित्र पक्षांचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये महापौरपदासाठी जुळवाजुळव सुरू झाली आहे. यामध्ये मुंबईसह अनेक महापालिकांचा समावेश आहे, त्यामुळे आता भाजपला यातील किती महापालिकांमध्ये आपला महापौर बसवण्यात यश येणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान महापौर पदासाठी आकड्यांचं गणित जुळवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच आता कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे कोल्हापूर महापालिकेत शिवसेना शिंदे गट काँग्रेससोबत युती करण्याची शक्यता आहे. याबाबत आता काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. कोल्हापूरमध्ये शिवसेना शिंदे गट काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे, याबाबत सतेज पाटील यांना विचारलं असता, पडद्यामागे सुरु असलेल्या घडामोडी जाहीर करू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे, सतेज पाटील यांच्या या सूचक विधानानंतर आता कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाची युती होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कोल्हापुरात कोणाला किती जागा?
कोल्हापुरात सतेज पाटील यांनी एक हाती खिंंड लढवली, या निवडणुकीत काँग्रेसला 37 जागा मिळाल्या मात्र तरी देखील ते बहुमतापासून दूर आहेत, तर दुसरीकडे भाजपनं देखील जोरदार मुसंडी मारल्याचं पहायला मिळत आहे, या महापालिकेत भाजपचे 27 नगरसेवक आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे 15 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 41 नगरसेवकांची आवश्यकता असल्यानं अशा परिस्थितीमध्ये कोल्हापूर महापालिकेत महायुतीचाच महापौर होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आता शिवसेना शिंदे गट काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या महापालिकेत आता कोणाचा महापौर होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.