
राज्यात महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत, मुदत संपल्यानंतर अनेक वर्षांनी महापालिकांच्या निवडणुका होत असल्यानं या निवडणुका सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता आघाडी आणि युतीची बोलणी सुरू झाली आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार जिथे-जिथे राष्ट्रवादी अजित पवार गटाची भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती होणार नाही, तिथे अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती करणार आहे. पुण्यात देखील असंच चित्र आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती करण्याची शक्यता आहे.
मात्र या युतीला पुण्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केला होता, मात्र त्यांच्या विरोधानंतरही या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशांत जगताप यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास पुण्यामध्ये काँग्रेसची ताकद वाढण्याची शक्यात आहे. तर दुसरीकडे रोज नई सुबहा होती है, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशांत जगताप यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतरही आपण महापालिका निवडणूक लढवणार असल्याचं प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलं आहे, त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर दोन्ही शिवसेनेकडून जगताप यांना पक्षप्रवेशासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र वैचारिक भूमिका पहाता ते आता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. काहीही झालं तरी भाजपमध्ये जाणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबईतील काँग्रेस भवनात पुणे महापालिका निवडणूक आणि जागावाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी पुण्याचे प्रभारी सतेच पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवरांची उपस्थिती आहेत, आणि आजच प्रशांत जगतापही मुंबईत दाखल झाल्यानं काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे.