‘धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या…’, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर मोठी मागणी केली आहे.

युद्धबंदीच्या घोषणेनंतर विरोधकांकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वराज चव्हाण यांनी या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत मोठी मागणी केली आहे. युद्धबंदीनंतर ज्या घटना घडल्या त्या वाईट आहेत, सोशल मीडियावर धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या, मोदी प्रेमी मिडीयावर कारवाई किंवा दंड झाला पाहिजे अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते.
नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
युद्धबंदीनंतर ज्या घटना घडल्या त्या वाईट आहेत. सोशल मीडियावर धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या, मोदी प्रेमी मीडियावर कारवाई किंवा दंड झाला पाहिजे, खोट्या बातम्या देण्यात आल्या, त्यामुळे जगभारत आपलं हसू झालं. मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी जे वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं आहे, त्यांना निलंबित करा अशी मागणीही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, युद्धबंदीनंतर ज्या घटना घडल्या त्या वाईट आहेत, योग्य ती माहिती दिली जात नाहीये, त्यामुळे आमची मागणी आहे की योग्य ती माहिती द्यायला हवी आणि संसदेत विशेष सत्र ऑपरेशन सिंदूर नंतर बोलवायला हवं होतं. मी पंतप्रधान मोदींची तुलना हिटलरशी केली नाही, पण हिटलरच्या काळामध्ये जशी एकाधिकारशाई होती तसंच देशात, राज्यात घडत आहे.
राज्यात गुन्हेगारीनं कळस गाठला आहे, बीडमध्ये सर्रास गुन्हेगारीच्या घटना सुरू आहेत. यावर कुणाचा अंकुश नाहीये, त्यामुळे राज्य वाऱ्यावर सोडले का? असा सवाल उपस्थित होत आहे. सरकारची भूमिका ही दुटप्पी आहे, मध्य प्रदेशचे मंत्री विजयशाह यांनी जे वक्तव्य केलं, ते अतिशय चुकीचं आहे. त्याची जितकी निंदा करावी तेवढी कमी आहे, तातडीने त्यांचा राजीनामा मोदी सरकारने घ्यायला हवा होता, पण तसं होताना दिसत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.