फुगेवाडी विषारी दारुचे बळी : पोलिसांनी कारवाई केली असती तर अक्षय वाचला असता, कुटुंबाचा टाहो
विषारी दारुमुळे दर काही वर्षांनी मृत्यूचे प्रकार राज्यात आणि देशात होत आले आहेत. या विषारी दारुच्या विक्रीला आळा घालण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. पुण्याच्या फुगेवाडी आणि हडपसर येथील विषारी दारुचे मृत्यू ही याचीच पुनरावत्ती आहे.

पुण्याच्या पिंपरी- चिंचवडच्या फुगेवाडी आणि हडपसर येथील विषारी दारुकांडाने महाराष्ट्रासह देशात हादरा बसला आहे. पुणे शहरातील १३ हून अधिक जणांचा या विषारी दारु प्राशनाने मृ्त्यू झाला आहे. यात घटनेत २८ वर्षांचा तरुण अक्षय अवसरमल याचाही मृत्यू झाला आहे. या परिसरात गेल्या २५ वर्षांपासून अवैध दारुचा धंदा सुरु होता. या विषयी अनेकदा तक्रार करुनही कारवाई झाली नाही. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असती तर आमचा अक्षय आज जीवंत असता अशा भावना अक्षयच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड फुगेवाडी परिसरात विषारी दारु प्यायल्याने १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या विषारी दारुमुळे फुगेवाडी आणि हडपसर येथील अनेक घरात आज अंधार पसरला आहे. विषारी दारुमुळे दर काही वर्षांनी देशभरात असे बळी जात असतात. तरीही गावठी दारु आणि हातभट्टी यांच्यावर पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोप मृतांचे कुटुंबिय करत आहेत. पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पोलीस आणि दारुभट्टी चालक यांच्या मिलीभगत असल्याचा आरोप देखील कुटुंबिय करीत आहेत.
अक्षय याच्या कुटुंबियांचा आरोप
२८ वर्षांच्या अक्षय अवसरमल याचा विषारी दारुने मृत्यू झाला आहे. गेल्या २५ वर्षांपासून या परिसरात दारुचा अवैध धंदा सुरु होता असा आरोप अक्षय याच्या कुटुंबियांनी केला आहे. आम्ही वारंवार या दारुच्या अड्ड्याविषयी तक्रारी केल्या होत्या. मात्र, पोलीस प्रशासनाने कोणतीच भूमिका घेतली नाही. जर पोलिसांनी वेळीच भूमिका घेतली असती तर आज आमचा अक्षय जीवंत असता अशी प्रतिक्रीया अक्षय याचे कुटुंबियांनी दिली आहे. प्रशासनाने आमच्या मुलाच्या मृत्यूची गंभीर दखल घेत आम्हाला मदत केली पाहिजे अशी मागणी या कुटुंबाने केली आहे.
दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
पुणे-मुंबई महामार्गावरील फुगेवाडी भागातील या विषारी दारुकांडाने प्रशासनाची निष्क्रीयता देखील उघड झाली आहे. फुगेवाडीतील मृतांमध्ये दोघा सख्ख्या भावांचा देखील समावेश आहे. विजय राठोड (३१) आणि राजेंद्र राठोड (३४) या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू या दारुमुळे झाला आहे.घरातील दोन कर्त्या पुरुषांच्या मृत्यूने राठोड कुटुंब उघड्यावर पडले आहे. या दोन मुलांच्या मृत्यूने त्यांच्या वडीलांची प्रकृती देखील चिंताजनक आहे. या कुटुंबियांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. या प्रकरणात योगेश वानखेडे याला अटक करण्यात आली असून यानेच दोन्ही ठिकाणच्या दारुअड्ड्यांवर ही दारु पुरवल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
शासनाने आर्थिक मदत करावी – अण्णा बनसोडे
आतापर्यंतचा मृत्यूचा आकडा १३ पर्यंत गेला आहे. या प्रकरणात माझे पोलिसांशी बोलणे झाले आहे. ८ आरोपींना पोलिसानी अटक केलेली आहे. अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी मी सूचना दिलेल्या आहेत. अशा गुत्त्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आपण पोलिसांना केली असल्याचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले आहे.ही घटना दुर्दैवी आहेच, पण आता याच्या मुळाशी जाऊन कारवाई होईल अशी अपेक्षा अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.