स्वेटरमुळे मिळालं जीवनदान, दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ल्यातून कशी वाचली महिला?
पुण्यातील आंबेगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याने भीतीचे वातावरण आहे. एका महिलेवर बिबट्याने झडप घातली, सुदैवाने ती थोडक्यात बचावली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. वन विभागाने तात्काळ पिंजरा लावला असून बिबट्याला पकडण्याची कार्यवाही सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात बिबट्याचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच आता पुण्यातील आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ थांबायला तयार नाही. आंबेगावच्या पारगाव येथील चिचगाईवस्ती येथे बिबट्याने थेट एका महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, ती महिला बिबट्याच्या या हल्ल्यातून महिला थोडक्यात बचावली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी शिवाजी ढोबळे (२९) या रात्री नऊ वाजता घराबाहेर गोठ्याच्या बाजूला लघुशंकेसाठी गेल्या होत्या. त्याचवेळी पाठीमागे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप मारली. अश्विनी ढोबळे यांच्या अंगावर असलेल्या स्वेटर होते. त्या स्वेटरमध्ये बिबट्याचा पंजा अडकल्याने त्या थोडक्यात बचावल्या. या झटापटीत त्यांचे स्वेटर फाटले. बिबट्याचा हल्ला होताच अश्विनी ढोबळे यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या पळून गेला.
पण या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्या प्रचंड घाबरल्या. त्या काही वेळासाठी बेशुद्ध पडल्या होत्या. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ पारगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी
या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी रुग्णालयात जाऊन अश्विनी ढोबळे यांची विचारपूस केली. वन विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. आंबेगावमध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्याठिकाणापासून काही अंतरावर तातडीने पिंजरा लावण्यात आला असून नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे.
या परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून यापूर्वीही अनेक शेतकऱ्यांना शेतात, रस्त्यात, दाराबाहेर बिबट्याचे दर्शन घडले आहे. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. या पकडलेल्या बिबट्यांना गुजरात येथील वनतारा येथे (जंगलात) सुरक्षित सोडावे, जेणेकरून नागरिकांच्या जीवितास असलेला धोका कायमस्वरूपी टळेल. बिबट्याला लवकरात लवकर पकडून नागरिकांची भीती दूर करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
