Vijay Wadettiwar : ‘ABVPच्या गुंडांनी अनाथ OBC मुलीकडून माफी मागायला लावली,’ विजय वडेट्टीवार यांचा आरोप, पुण्यात रात्री काँग्रेस-ABVP मध्ये तुफान राडा
Vijay Wadettiwar : वसतिगृहात एका अनाथ ओबीसी विद्यार्थिनीने मांडलेली व्यथा आणि त्यानंतर तिची घेण्यात आलेली मुलाखत यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) चे कार्यकर्ते आमनेसामने आले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शनिवारी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ हा विद्यार्थी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मात्र राहुल गांधी येण्यापूर्वीच काल रात्री पुण्यात मोठा राडा पाहायला मिळाला. राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यापूर्वी झालेल्या या हायव्होल्टेज ड्रामानंतर वडेट्टीवार यांनी आरोप केले आहेत.‘वसतिगृहात मुलींनीच मुलींची मुलाखत घेऊन ओबीसी मुलीला बोलते केले, पण तिचा आवाज दाबण्यासाठी तिला डांबून ABVPच्या गुंडांकडून माफी मागण्यास भाग पाडणयात आलं’ असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या पुणे दौऱ्यातील विद्यार्थी संवाद कार्यक्रमाच्या अवघ्या काही तास आधी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (COEP) हॉस्टेल कॅम्पसमध्ये मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
वसतिगृहात एका अनाथ ओबीसी विद्यार्थिनीने मांडलेली व्यथा आणि त्यानंतर तिची घेण्यात आलेली मुलाखत यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) चे कार्यकर्ते आमनेसामने आले. या राड्यानंतर पुणे पोलिसांनी 50 ते 60 युवक काँग्रेस आणि एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असून परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
‘मुलींनी घेतली मुलीची मुलाखत, अनाथ मुलीकडून माफी मागून घेतली’
या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी एका अनाथ ओबीसी विद्यार्थिनीची मुलाखत आणि तिचा माफीनामा आहे. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसच्या काही महिला कार्यकर्त्यांनी वसतिगृहात जाऊन या अनाथ विद्यार्थिनीशी संवाद साधला होता. या मुलीने तिची शिष्यवृत्ती मिळत नसल्याची आणि शैक्षणिक अडचणींची व्यथा मांडली, ज्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले.
दबावाखाली माफीनामा लिहून घेतला
मात्र, एबीव्हीपीने आरोप केला की, काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजकीय फायद्यासाठी आणि राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या जाहिरातबाजीसाठी या अनाथ मुलीवर दबाव आणून हे वक्तव्य रेकॉर्ड केले. यावरून हॉस्टेलमधील इतर विद्यार्थिनी आणि एबीव्हीपी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. या वादावादीनंतर संबंधित अनाथ मुलीकडून दबावाखाली माफीनामा लिहून घेण्यात आला, ज्यावरून काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
बळजबरीने माफी मागून घेतली गेली
या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले, “मुलींनी मुलींची मुलाखत घेतली आणि त्यात अनाथ ओबीसी मुलीने तिची व्यथा मांडली. यात काय चूक होती? पण तिचा आवाज दाबण्यासाठी तिला डांबून ठेवण्यात आले आणि तिला बळजबरीने माफी मागायला लावली. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे”
पोलिसांच्या भूमिकेवरही तीव्र प्रश्नचिन्ह
वडेट्टीवार यांनी पुणे पोलिसांच्या भूमिकेवरही तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “रात्रीच्या वेळी पोलीस घटनास्थळी हजर असूनही त्यांनी गुंडांवर कारवाई करण्याऐवजी उलट पीडित मुलींवरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनींना खोलीत कुलूप लावून डांबणाऱ्या आणि ओबीसी मुलीचा छळ करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे”
काल COEP कॉलेजमधील काही विद्यार्थीनींनी माध्यमांमध्ये बाईट दिला होता की, कॉलेजमधून आम्हाला तीन वर्षांपासून स्कॉलरशीप मिळालेली नाही. हा मुद्दा आम्ही राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार आहोत. यानंतर ABVPच्या काही गुंडांनी या मुलींना धमकावलं, त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला जावू नये…
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 21, 2026
50 ते 60 काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
दुसरीकडे, एबीव्हीपीने काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावले असून बाहेरील 100 ते 150 काँग्रेस कार्यकर्त्यांनी रात्री बेकायदेशीरपणे कॅम्पसमध्ये घुसून सामान्य विद्यार्थ्यांना धमकावल्याचा आरोप केला आहे. एबीव्हीपीचे कार्यकर्ते मल्हार पाटील यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवर बेकायदेशीर जमाव जमवणे, मारहाण आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पुणे पोलिसांनी हॉस्टेल परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला असून, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.